मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजराजकारणमहाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचार

चंद्रपूरमध्ये ‘संवाद सेतू’ कार्यक्रमात मुनगंटीवारांनी पदवीधरांना कार्यक्षमता पाहून मतदानाचे आवाहन केले; मत अवैध ठरू नये, अशी सूचना केली.

· · २ मिनिटांचे वाचन
नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचार

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जात-पात किंवा धर्माच्या रेषेवर नाही, तर उमेदवाराची कार्यक्षमता, अनुभव आणि प्रश्न मांडण्याची क्षमता पाहून लढवावी, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज, चंद्रपूर येथे ‘संवाद सेतू’ कार्यक्रम पार पडला. त्यात ते पदवीधर मतदारांशी बोलत होते. येत्या २३ ऑक्टोबरला कोहळे यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर, प्राचार्य लियाकत अली आदी उपस्थित होते.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. भारतीय संविधानाने विधानपरिषदेच्या माध्यमातून पदवीधरांना प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे. पदवीधरांचा प्रतिनिधी केवळ सभागृहाचा सदस्य नसतो; शिक्षणासह समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून शासनाला निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारा दुवा असतो, असे ते म्हणाले.

कोहळे यांना विधानसभेचा अनुभव असून पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पदवीधर मतदारसंघातून त्यांना संधी मिळाल्यास शिक्षण आणि पदवीधरांशी संबंधित प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

शिक्षण हे व्यक्तीच्या प्रगतीचे आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगताना ते म्हणाले, वित्तमंत्री असताना चंद्रपूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. कृषी महाविद्यालय आणले. महिलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ५० एकर जागेत एसएनडीटीचे केंद्र उभे राहत आहे. शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता मिळाली असून पुढील वर्षी बीडीएस महाविद्यालय आणण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात भविष्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यांच्या शैक्षणिक न्यायहक्कांसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मतदान करताना मत अवैध ठरणार नाही याची विशेष काळजी घेऊन मत अचूक नोंदवा, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.