नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्यांनी तूर्तास आपापल्या घरी परतून कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी मंगळवारी केले.
'एक्स'वरील व्हिडीओतून दीपके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तुरुंगात असलेले सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या आठवणीने ते भावूक झाले. आशुतोष आणि सौरव तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संपूर्ण देश त्यांना सलाम करेल, असे ते म्हणाले.
सीजेपीच्या आंदोलनाची फ्रान्समधील अशांततेशी तुलना करणाऱ्यांनाही दीपके यांनी प्रत्युत्तर दिले. भारतातील आंदोलन आणि फ्रान्समधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'आम्ही द्वेषाविरोधात लढत आहोत; मात्र हा द्वेष आपल्या मनात शिरू नये, याची काळजी घेतली पाहिजे. जे लोक आपला द्वेष करतात, त्यांच्यासारखे आपण होता कामा नये. प्रेम, करुणा आणि माणुसकी हीच आपली सर्वांत मोठी ताकद आहे,' असे ते म्हणाले.
दिल्लीतील पीतमपुरा परिसरात दसऱ्यानिमित्त रावणाच्या पुतळ्यांसोबत झुरळाचा भलामोठा पुतळा जाळण्याच्या तयारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या घटनेवर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी संबंधित रामलीला समितीला उपरोधिकपणे, 'मोफत प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद', असा संदेश दिला.
दरम्यान, 'पीपल अगेन्स्ट एसआयआर' या विविध संघटनांच्या आघाडीने शुक्रवारी, २३ ऑक्टोबरला 'पीपल मार्च टू रिक्लेम डेमोक्रसी' या नावाने देशव्यापी मोर्चाची घोषणा केली आहे. तहसील, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर हे मोर्चे काढले जाणार असल्याचे आघाडीने म्हटले आहे.
सीजेपीच्या आंदोलनापासून दूर राहिलेल्या काँग्रेसच्या नॅशनल स्टुडन्स युनियन ऑफ इंडियासह (एनएसयूआय) विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन पुढे सुरूच राहील, असे स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी एनएसयूआयने मंगळवारी देशव्यापी पुढचा दहन कार्यक्रम आयोजित केला होता.
दरम्यान, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, रात्रीच सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या दोघांची न्यायालयीन कोठडी २१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. त्यांचे वर्तन कायद्याप्रती आदर दर्शवत नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते.