नाशिक : अल निनोच्या पार्श्वभूमीवर धरणांतील उपलब्ध पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवावे लागणार असल्याने नाशिक पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी कडक प्राधान्यक्रम जाहीर केला आहे. पाण्याचे वाटप पिण्याच्या गरजेपासून सुरू होईल आणि शेतकऱ्यांना ते शेवटी मिळेल.
पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार प्रथम पिण्याचे पाणी, जनावरांची तहान, औद्योगिक वापर आणि महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ व अन्य संस्थांचा चारा व बियाणे कार्यक्रम यांची गरज भागवली जाईल. त्यानंतर पाणी शिल्लक राहिल्यास कमी पाणी लागणारी रब्बी भुसार पिके आणि जास्त चारा देणारी पिके यांना प्राधान्य मिळेल. त्यानंतरही शिल्लक राहिल्यास अन्य रब्बी पिकांचा विचार होईल.
गंगापूर, दारणा, मुकणे, पालखेड, कडवा, भावली, वाकी, भाम, गौतमी-गोदावरी, काश्यपी आणि आळंदी या धरणांवर तसेच गंगापूर डावा तट, गोदावरी उजवा व डावा तट, आळंदी डावा व उजवा, पालखेड उजवा तट, कडवा उजवा तट आणि भोजापूर डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना हा निर्णय लागू आहे.
इच्छुक शेतकरी आणि पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ चा मागणी अर्ज जवळच्या सिंचन शाखा कार्यालयात २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत दाखल करून पोहोच घ्यावी. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींना पाण्याचा वापर कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवून किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. गरज पडल्यास कपात वाढवावी लागेल.
शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनावर भर द्यावा, असे आवाहनही केले आहे. आवर्तनात पाणी कमी मिळाल्यास पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी शेतकऱ्याची राहील आणि जलसंपदा विभागाकडून भरपाई मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील २६ प्रमुख धरणांत सध्या सुमारे ६५,४९१ दलघफू म्हणजे ९२.७४ टक्के पाणीसाठा आहे. गंगापूर समूहात ९२ टक्के आणि दारणा समूहात ९० टक्के साठा आहे. तरीही जिल्ह्यातील चार तालुक्यांत ३७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अल निनोचा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत राहील, असा अंदाज आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.