अमरावती : मेळघाट परिसरातील चिखलदरा तालुक्यात आडनदी येथे प्रस्तावित १,५०० मेगावॅटच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र तोडावे लागणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीसमोर या प्रकल्पाचा प्रस्ताव आला आहे. अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड ही कंपनी प्रकल्प उभारणार आहे.
प्रकल्पासाठी एकूण सुमारे २४०.६१ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यात ७६.८४ हेक्टर वनेतर जमीन आणि १६३.७७ हेक्टर वनजमीन आहे. प्रकल्पाची क्षमता ३०० मेगावॅटच्या चार आणि १५० मेगावॅटच्या दोन युनिट्स अशी १,५०० मेगावॅट असून साठवण क्षमता ९,००० मेगावॉट-तास आहे.
हा जलाशय-आधारित पंप्ड स्टोरेज प्रकल्प आहे. त्यासाठी दोन नवे जलाशय बांधले जाणार आहेत. वरचा जलाशय कामापूर गावाजवळील एका बारमाही नसलेल्या ओढ्यावर, तर खालचा जलाशय आडनदी गावाजवळील दुसऱ्या ओढ्यावर प्रस्तावित आहे.
नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पुरत नसल्याने जलाशय भरण्यासाठी आणि दरवर्षी बाष्पीभवनाची भरपाई करण्यासाठी बाहेरील पाण्याचा वापर होणार आहे. सुमारे ४.५ किमी अंतरावरील सपन धरण आणि सुमारे ५ किमी अंतरावरील चंद्रभागा धरण हे दोन पर्याय सुचवण्यात आले आहेत. हे पाणी पाइपलाइन किंवा कालव्याद्वारे जलाशयांपर्यंत आणले जाणार आहे.
या प्रकल्पात ३०० मेगावॅट क्षमतेचे चार आणि १५० मेगावॅट क्षमतेचे दोन असे सहा उलट्या दिशेने चालणारे पंप टर्बाइन बसवले जाणार आहेत. त्यामुळे वीजमागणी कमी असताना पाणी वर चढवून आणि मागणी वाढल्यावर ते सोडून वीजनिर्मिती करता येणार आहे.
समितीने वरच्या जलाशयाच्या बाबतीत तज्ज्ञ संस्थेच्या सल्ल्याने सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
प्रकल्पासाठी वन मंजुरीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मेळघाट हा परिसर वनसंपदेसाठी संवेदनशील मानला जातो. त्यामुळे वनक्षेत्र कमी होण्याच्या मुद्द्यावर स्थानिक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. प्रकल्पाच्या पुढील मंजुरीच्या टप्प्यांवर या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.