गणपती बाप्पाच्या चरणी वाहलेली भक्ती, अखंड सेवा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गजर केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार दुमदुमला आहे. ‘महागणेशोत्सव : महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ चे निकाल जाहीर झाले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर हाँगकाँग, राष्ट्रीय पातळीवर उत्तराखंड तर राज्य पातळीवर सांगलीच्या गणेशोत्सव मंडळाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. बाप्पाच्या सेवेत रात्रंदिवस एक करणाऱ्या तब्बल ३५४ गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्सवाचे चैतन्य द्विगुणित केले.
यंदाच्या स्पर्धेत केवळ मंडळेच नव्हे, तर ज्यांच्या तळहाताच्या स्पर्शाने मातीला देवत्व प्राप्त होते, त्या मूर्तिकारांच्या कलेचाही सन्मान करण्यात आला आहे. शासनातर्फे यंदा नव्याने सुरू करण्यात आलेला मानाचा ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार पुरस्कार’ पारंपरिक मूर्तिकलेचा वारसा जपणारे ज्येष्ठ मूर्तिकार राजन विष्णू पाटकर यांना जाहीर झाला आहे.
जागतिक, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर कुणी मारली बाजी? परदेशात राहूनही मराठी मातीची आणि परंपरेची नाळ घट्ट जपणारी मंडळे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरली.
आंतरराष्ट्रीय स्तर (सातासमुद्रापार बाप्पाचा डंका):
प्रथम क्रमांक: महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँग द्वितीय क्रमांक: एडोगावा इंडिया कल्चर सेंटर, जपान तृतीय क्रमांक: हेसन इंडियन लेडीज असोसिएशन अँड पायोनियर इंडियन्स ई.व्ही.
राष्ट्रीय स्तर (देशभरात घुमला उत्सवनाद):
प्रथम क्रमांक: महाराष्ट्र समाज सेवा समिती, उत्तराखंड द्वितीय क्रमांक: श्री राम युवक मंडळ, कर्नाटक तृतीय क्रमांक: गणराया गणेश उत्सव, गुजरात
राज्य स्तर (महाराष्ट्राची शान):
प्रथम क्रमांक: मोरया गणेश मंडळ, सांगली द्वितीय क्रमांक: छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ (दीपकनगर), नांदेड तृतीय क्रमांक: स्वराज्य गणेश मंडळ, देवनांद्रा
या तिन्ही स्तरांवरील विजेत्यांना अनुक्रमे साडेसात लाख रुपये (प्रथम), पाच लाख रुपये (द्वितीय) आणि अडीच लाख रुपये (तृतीय) रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा उत्साह केवळ महानगरांपुरता मर्यादित न राहता जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्यात आला असून तेथील विजेत्यांचीही स्वतंत्र घोषणा करण्यात आली आहे.
मातीला देवपण देणारे मूर्तिकार राजन पाटकर यांचा गौरव पिढ्यानपिढ्या चालत आलेला मूर्तिकलेचा वारसा आणि मूर्तीत प्राण फुंकणारे हात... या निरलस साधनेला अखेर राज्य शासनाचा मानाचा मुजरा मिळाला आहे. यंदापासून सुरू करण्यात आलेल्या पहिल्या ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार पुरस्कारा’चे मानकरी राजन विष्णू पाटकर ठरले आहेत. शाल, सन्मानचिन्ह आणि अडीच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राजन पाटकर यांचे नाव मुंबईच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात अत्यंत आदराने घेतले जाते. मुंबईची शान असलेल्या ‘गिरगावचा राजा’च्या नयनरम्य मूर्तीमागे त्यांचीच कलासाधना आहे. इतकेच नव्हे, तर वडाळा येथील प्रसिद्ध जी.एस.बी. सेवा मंडळाच्या महाकाय आणि देखण्या गणेशमूर्तीचे ते मुख्य मूर्तिकार असून, गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ते श्रद्धेने ही सेवा अविरत करत आहेत.
त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी परंपरेसोबतच निसर्गाचे रक्षण करण्याची शिकवणही दिली आहे. पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देत त्यांनी तयार केलेल्या हलक्या वजनाच्या आणि पाण्यात सहज विरघळणाऱ्या ‘पेपर मेशी’च्या गणेशमूर्तींना मुंबईपासून थेट लंडनपर्यंत पसंती मिळत आहे.
संस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम या भव्य महोत्सवावर आनंद व्यक्त करत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विजेत्यांचे व सर्व सहभागी मंडळांचे कौतुक केले.