लातूर : जिल्ह्याच्या सहकार आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाला. १९ संचालक जागांपैकी १४ जागांवर काँग्रेससमर्थित सहकार पॅनलने विजय मिळवला, तर ५ जागांवर भाजप-महायुतीच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होती. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या; उर्वरित १५ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते.
या निवडणुकीत तब्बल ९९.४० टक्के मतदान झाले. एकूण ९९९ मतदारांपैकी ९९३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ८२३ पुरुष आणि १७० महिला मतदार होते. लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, अहमदपूर, चाकूर आणि जळकोट येथील तहसील कार्यालयांसह उदगीरच्या प्रशासकीय भवनात, अशा दहा केंद्रांवर मतदान झाले.
सर्वांचे लक्ष लागलेल्या निलंगा मतदारसंघात भाजप नेते तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवला. त्यांनी आपल्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला.
इतर निकालांमध्ये भाजप आमदार रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी काँग्रेसचे अशोक गोविंदपुरकर यांचा पराभव केला. सहकार पॅनलकडून लढलेल्या दिवंगत माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले या विजयी झाल्या. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव हेदेखील सहकार पॅनलकडून विजयी झाले.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूरमधील या निवडणुकीकडे राज्याच्या सहकार क्षेत्राच्या दृष्टीनेही पाहिले जात होते. महायुतीत सहकारमंत्री असलेल्या पक्षाच्या नेत्याने सहकार पॅनलला पाठिंबा दिल्याची चर्चा या निकालानंतर अधिक जोरात सुरू आहे.
या निवडणुकीत सहकार पॅनलचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याकडे होते, तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि बसवराज पाटील यांच्याकडे होते. एकूण १५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते.