जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १६ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
२१ जागांसाठी ४०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवार, १७ नोव्हेंबर हा उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे. आणखी ८ ते १० जागा बिनविरोध होण्याची शक्यता जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
बिनविरोध झालेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी पाटील आणि पत्नी मृणाल पाटील यांचा समावेश आहे. भाजपकडून भुसावळ मतदारसंघातून मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हेही बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला भाजप १०, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४ असा चर्चेत आहे. जवळपास १५ ते १६ जागांवर महायुतीतील नेत्यांचे एकमत झाले असले, तरी मुक्ताईनगर, चोपडा आणि बोदवड या तीन जागांवर तिढा सुटलेला नाही.
मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. चोपड्यात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात वाद आहे.
सोमवारी जळगावच्या शासकीय अजिंठा विश्रामगृहात जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुमारे पाच तासांच्या बैठका झाल्या. तरीही तीन जागांवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
महायुतीकडून महाविकास आघाडीला २१ पैकी एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ती जागा कोणत्या पक्षाला द्यायची, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावा, असे महायुतीने सुचवले आहे.
'आमच्या ९० टक्के वाटाघाटी झालेल्या आहेत. महाराष्ट्रात इतक्या सहजतेने बँकेची निवडणूक कुठेच झाली नसेल,' असे महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. २१ पैकी २१ जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे लक्ष्य बँकेला अनुत्पादित कर्जाच्या (एनपीए) अडचणीतून बाहेर काढणे हे आहे. त्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे.
एकनाथ खडसेही रिंगणात उतरल्याने ही लढत चुरशीची मानली जात आहे.
उमेदवारी माघारीनंतर प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार राहतात, यावरून जिल्ह्याचे राजकारण स्पष्ट होईल.