लखनऊ : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील स्वगणनेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. १६ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत नागरिक आपली आणि कुटुंबाची माहिती स्वतः अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपवर नोंदवू शकणार आहेत.
उत्तर प्रदेशच्या जनगणना संचालक आणि मुख्य प्रधान जनगणना अधिकारी शीतल वर्मा यांनी शनिवारी ही माहिती दिली. स्वगणनेसाठी se.census.gov.in हे संकेतस्थळ वापरायचे आहे. भाषा निवडून मोबाइल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे नोंदणी झाल्यानंतर प्रश्नावली भरायची आहे. माहिती जमा झाल्यावर ११ अंकी स्वगणना ओळख क्रमांक मिळेल. प्रगणक घरी आल्यावर हा क्रमांक दाखवायचा आहे.
१ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या काळात प्रगणक घरोघरी जाऊन माहिती घेतील. त्यावेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्याबाबत ४० प्रश्न विचारले जातील. नाव, मुख्याशी नाते, लिंग, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयत्व, धर्म, जात, अपंगत्व, मातृभाषा, साक्षरता आणि डिजिटल साक्षरता, शिक्षण, कामाचे स्वरूप, स्थलांतर, जन्मलेली व जिवंत असलेली अपत्ये, कोविड लसीकरण आणि बँक खाते अशा बाबींचा त्यात समावेश आहे.
१९३१ नंतर प्रथमच जनगणनेत जातनिहाय मोजणी होत आहे. मात्र जात सांगणे बंधनकारक नाही. जात नोंदवायची असेल तर स्वतः नोंदवता येईल किंवा प्रगणकाला सांगता येईल. जातीव्यवस्थेवर विश्वास नसेल तर जात न सांगण्याचा पर्यायही खुला आहे. मात्र गणनेत सहभाग नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे वर्मा यांनी स्पष्ट केले.
जनगणनेची संदर्भ तारीख ५ जानेवारी २०२७ ची मध्यरात्र आहे. भटक्या लोकांची गणना ४ जानेवारीच्या रात्री केली जाईल. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडच्या बर्फ नसलेल्या भागांत हा टप्पा लवकर होत असून देशाच्या उर्वरित भागांत फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष गणना होईल. देशाची ही १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. पहिल्यांदाच संपूर्ण डिजिटल पद्धतीने ही गणना होत आहे.
जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम १५ अंतर्गत दिलेली माहिती गोपनीय राहते. जनगणनेचा नागरिकत्व किंवा कर आकारणीशी संबंध नाही आणि कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लोकभवन सभागारातून स्वगणना मोहिमेचा शुभारंभ करतील.