पंढरपूर (सोलापूर) : आंबे येथील विहिरीत २२ तासांहून अधिक काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिसऱ्या मजुराचा मृतदेह सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात रविवारी सकाळी सुमारे १० वाजता ही दुर्घटना घडली होती.
शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतातील सुमारे ५० फूट खोल विहिरीचे काम पूर्ण झाले होते. मोजमापाचे काम सुरू असताना दगड आणि मातीचा ढिगारा अचानक कोसळला आणि विहिरीत उतरलेले चार मजूर त्याखाली गाडले गेले. त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
रांजणी येथील सिद्धेश्वर दत्तू घाडगे (३५), मंगेश गोविंद मोरे (४०), तसेच आंवली येथील तानाजी घोडके (५५) आणि आबासाहेब भिवा घोडके (५५) अशी मजुरांची नावे अधिकाऱ्यांनी दिली. सिद्धेश्वर घाडगे यांचा मृतदेह रविवारी रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. मंगेश मोरे यांचा मृतदेह सोमवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान आणि तानाजी घोडके यांचा मृतदेह सकाळी साडेसातच्या सुमारास ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. आबासाहेब घोडके यांचा शोध अद्याप सुरू आहे.
विहिरीत पाणी साचल्याने आणि मोठे दगड असल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाला बचावकार्यात अडचणी येत आहेत. पोकलेन यंत्रांच्या साह्याने ढिगारा हटवला जात आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
रविवारी रात्री एक वाजता घटनास्थळी दाखल झालेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. विहिरीच्या कामात कोणती पद्धत वापरली, परवानगी घेतली होती का, स्फोटके वापरण्यात आली होती का आणि सुरक्षेचे उपाय काय होते, या सर्वांची सखोल चौकशी समिती स्थापन करून केली जाईल, असे ते म्हणाले.
सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे रविवारपासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत. जिल्ह्यात अशा पद्धतीने सुरू असलेल्या विहिरींचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. विहीर खोदताना शासनाच्या सर्व परवानग्या घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.