जयपूर : राजस्थानमध्ये शुक्रवारी सकाळी 8 वाजता 37 जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि दुपारपर्यंत काँग्रेस 144 पंचायत समित्यांत आघाडीवर होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 88 समित्यांत पुढे आहे.
जिल्हा परिषदांच्या शर्यतीत काँग्रेस 13 ठिकाणी तर भाजप 10 ठिकाणी आघाडीवर आहे. आतापर्यंत निकाल लागलेल्या 3,462 पंचायत समिती जागांपैकी काँग्रेसने 1,882 जागा जिंकल्या असून भाजपच्या वाट्याला 1,149 जागा आल्या. अपक्षांनी 272, रालोपाने 233 आणि बापने 100 जागा जिंकल्या.
दिवसातला सर्वात चर्चित निकाल सीकरमधून आला. शहरविकास व गृहनिर्माण मंत्री झाबरसिंग खर्रा यांच्या पत्नी शांतीदेवी अजितगड पंचायत समितीच्या वॉर्ड 17 मधून काँग्रेसच्या सरिता देवी यांच्याकडून 51 मतांनी हरल्या. अजितगडमध्ये काँग्रेसने 17 पैकी 13 जागा जिंकल्या, भाजपला तीन आणि अपक्षाला एक जागा मिळाली. खर्रा यांचे दोन्ही मुलगे अजयसिंह आणि दुर्गासिंह हेही श्रीमाधोपूर पंचायत समितीतून पराभूत झाले.
सीकर जिल्हा परिषदेत काँग्रेस 18 तर भाजप 16 जागांवर पुढे आहे. भाजपचे सीकर जिल्हाध्यक्ष मनोज बाटड यांच्या पत्नी गणपती वॉर्ड 3 मधून काँग्रेसच्या रजनी यांच्याकडून हरल्या.
जयपूर जिल्हा परिषदेत निकाल जाहीर झालेल्या 15 पैकी 11 जागा काँग्रेसने जिंकल्या. भाजपला दोन तर रालोपाला एक जागा मिळाली.
चार टप्प्यांत 22 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. 41,480 मतदान केंद्रांवर 2.48 कोटींहून अधिक मतं पडली. 1,275 जिल्हा परिषद वॉर्डांसाठी 4,069 तर 7,543 पंचायत समिती वॉर्डांसाठी 25,108 उमेदवार रिंगणात होते.
कोटा, बारां, करौली आणि श्रीगंगानगर या चार जिल्ह्यांतील मतमोजणी 17 डिसेंबरला होणार आहे. तेथील विद्यमान संस्थांची मुदत 22 डिसेंबरला संपत असल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.
पुढचा टप्पा 25 नोव्हेंबरला — जिल्हा प्रमुखांची निवड. त्यानंतर 26 नोव्हेंबरला उप-जिल्हा प्रमुख आणि 24-25 डिसेंबरला प्रमुख-उपप्रमुख निवडी होतील.