मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रमहाराष्ट्र

जरांगे ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी करा; राऊतांवर भाजपचा हल्लाबोल

मनोज जरांगे यांच्या नावाने पसरत असलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी तसेच त्यातून उभ्या झालेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी त्यांनी केली.

· · २ मिनिटांचे वाचन
जरांगे ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी करा; राऊतांवर भाजपचा हल्लाबोल

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत व महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे यांच्या नावाने पसरत असलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी तसेच त्यातून उभ्या झालेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी त्यांनी केली. रेहान वाड्रा यांच्या समर्थनावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना बन यांनी असा आरोप केला की, "सत्तेसाठी हिंदुत्व गहाण" ठेवणाऱ्या राऊत यांचे राजकारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाऊन काँग्रेसच्या चाकरीपर्यंत पोहोचले आहे. रेहान वाड्रा यांच्या समर्थनासाठी चित्रप्रदर्शनाची तयारी सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना बन म्हणाले की, "एआयच्या जमान्यात प्रत्येक ऑडिओ क्लिप सत्य मानता येणार नाही." या क्लिपचा संदर्भ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचाही दावा त्यांनी केला आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली. 500 कोटी रुपयांच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचा दावा केला जात असताना 500 कोटींचा आकडा कुठून आला? आरोप गंभीर असून चौकशीही तितकीच गंभीर हवी, असे ते म्हणाले. "ऑडिओ क्लिपमागे कोण?" असा सवाल करताना बन यांनी राऊत यांच्या "एका दगडात तीन पक्षी" या विधानाकडे लक्ष वेधले. भाजप, एकनाथ शिंदे व मनोज जरांगे यांना बदनाम करणाऱ्या या क्लिपमागील सूत्रधाराचा शोध एसआयटीने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. क्लिप एआयच्या माध्यमातून तयार झाली असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी तिची तांत्रिक तपासणी करण्याचे आवाहन केले. पुरावे असतील तर एसआयटीकडे देण्याचे आवाहन करत बन म्हणाले की, "आरोपांऐवजी पुरावे द्या; सत्य तपासातूनच समोर येईल." मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले असून आता सत्य बाहेर येण्याची प्रतीक्षा असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, पदवीधर व शिक्षक मतदारांना "प्रत्येकी 10 हजार रुपये वाटल्याच्या" आरोपाबाबत बन यांनी राऊत यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आणि पुणे व छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारांचा उल्लेख करून या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला. अदानी-अंबानी यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, "एकीकडे अदानी-अंबानींवर टीका आणि दुसरीकडे त्यांच्याच घरी स्वागत" हा विरोधकांच्या दुटप्पीपणाचा नमुना आहे. सत्तेचा अमरपट्टा जनतेच्या हातात असून मोदी-शाह यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचा दावाही त्यांनी केला. सुप्रिया सुळे यांच्या स्पाय कॅमेरा आरोपांवर बन म्हणाले की, हजारो स्पाय कॅमेऱ्यांचा दावा करण्यात येत असला तरी एकही पुरावा का नाही? पुरावे असतील तर दाखवावेत व मतदारांना घाबरवण्याचे राजकारण थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले. पदवीधर व शिक्षक मतदारांनी अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असेही ते म्हणाले.