मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रमहाराष्ट्र

पोलीस स्मृतिदिन: नायगाव स्मृतीस्तंभावर 154 हुतात्म्यांना फडणवीसांची श्रद्धांजली

नायगाव पोलीस मुख्यालयातील स्मृतीस्तंभावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र वाहून 36 अधिकारी व 118 अंमलदार अशा 154 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

· · २ मिनिटांचे वाचन
पोलीस स्मृतिदिन: नायगाव स्मृतीस्तंभावर 154 हुतात्म्यांना फडणवीसांची श्रद्धांजली

मुंबई : नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मृतीस्तंभावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुष्पचक्र वाहून पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या 36 पोलीस अधिकारी व 118 पोलीस अंमलदार अशा एकूण 154 हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले.

"असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या 36 पोलीस अधिकारी आणि 118 पोलीस अंमलदार अशा एकूण 154 पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो," अशा शब्दांत फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

विविध देशांच्या दूतावासांतील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. फडणवीस यांनी सर्वांची भेट घेतली. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी स्मृतीदिन संचलनाचे संयोजन केले.

कर्तव्यनिष्ठेपोटी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी स्मृती संचलन होते. 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्य तसेच अर्ध सैनिक दलातील शहीद झालेल्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी यंदाचे संचलन झाले.