नाशिक : पेठरोडवर आरटीओ कार्यालयासमोर, सप्तरंग सोसायटीच्या मागे कोमल सोसायटीत ३० वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी (१९ नोव्हेंबर) उघडकीस आली. पंचवटी परिसरातील या घटनेनंतर म्हसरूळ पोलिसांनी तिचा पती आणि रिक्षाचालक असलेल्या आरोपीला अटक केली आहे.
मृत महिलेचे नाव पूजा आकाश यादव असे असून आरोपी पतीचे नाव आकाश सुरेश जाधव (वय ३०) असे पोलिसांनी सांगितले. पूजा यांची धाकटी बहीण सुधा रामबाबू यादव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिहारमधील पूजा यादव यांच्याशी आरोपीचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर दोघे पेठरोड परिसरात राहत होते. काही दिवसांपासून आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालत होता.
बुधवारी रात्री पूजा कामावरून घरी आल्यानंतर जेवण झाल्यावर बेडवर मोबाईल पाहत बसल्या होत्या. आरोपीने मोबाईल मागितला असता त्यांनी तो देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाला.
या वादातून आरोपीने बेडवरची ओढणी पूजा यांच्या गळ्याभोवती आवळल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले. काही वेळाने पूजा बेडवर निपचित पडलेल्या अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्यासह पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, पोलीस उपनिरीक्षक मयुरी तुरे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पूजा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आरोपी मूळचा बिहारचा असून त्याचे वडील महाराष्ट्रात स्थायिक झाल्याने तो नाशिकमध्येच राहत होता. त्याचे आडनाव यादवऐवजी जाधव असे नोंदवले गेल्याचेही पोलिसांनी सांगितले.
घटनेच्या वेळी आरोपीने दारूचे सेवन केले होते, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पैशांच्या मागणीवरून झालेल्या वादात पूजा यांनी आरोपीला घरातच कोंडून ठेवल्याचेही पोलिसांनी सांगितले.