नांदेड : खरीप हंगामात झालेल्या मोठ्या पर्जन्यतुटीमुळे आणि भूजल पातळी घसरल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुके एका वर्षासाठी 'पाणीटंचाई क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी हा आदेश जारी केला.
हा आदेश महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९ अंतर्गत काढण्यात आला आहे. राज्य शासनाच्या २५ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर २०२६ च्या शासन निर्णयांनुसार जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले आहे.
नवीन निर्बंधांनुसार शेती किंवा औद्योगिक वापरासाठी ६० मीटरपेक्षा खोल विहीर अथवा बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटरच्या परिघात कोणत्याही प्रयोजनासाठी नवीन विहीर अथवा बोअरवेल खोदता येणार नाही.
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटरच्या परिघातील खासगी विहिरी व बोअरवेलमधून व्यावसायिक अथवा सिंचनासाठीच्या अनिर्बंध भूजल उपसावर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. गरज भासल्यास पिण्याच्या पाण्यासाठी अशा विहिरींचे तात्पुरते अधिग्रहण करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
भूजलाची व्यावसायिक विक्री आणि टँकरद्वारे वाहतुकीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व बोअरवेल रिग मशीनच्या मालकांनी व चालकांनी १५ दिवसांच्या आत संबंधित उपविभागीय दंडाधिकारी किंवा तहसीलदारांकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. प्रत्येक रिगवर जीपीएस यंत्रणा बसवणे आवश्यक आहे.
अनधिकृत खोदकाम आढळल्यास यंत्रसामग्री जप्त होईल, असे आदेशात म्हटले आहे. अंमलबजावणीसाठी महसूल, विकास व पोलीस प्रशासनाची संयुक्त भरारी पथके तयार करण्यात आली असून त्यांना तपासणी करणे, साधने जप्त करणे आणि गरजेनुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे अधिकार आहेत.
दरम्यान, विष्णुपुरी धरणातून यंदा रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नाही. उपलब्ध साठा नांदेड शहर, ग्रामीण भाग व उद्योगांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
धरणात सध्या ५७.१४ टक्के म्हणजेच ४६.१६ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य पाणीसाठा आहे. "मर्यादित साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे," असे कर्डिले यांनी सांगितले आणि शेतकरी व नागरिकांनी परिस्थितीची जाणीव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन केले.