पुणे : इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कारभारावरून सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बुधवारी आमनेसामने आले. एकाच दिवशी, एकाच कार्यालयावर दोन मोर्चे निघाल्याने तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपचा मोर्चा सकाळी १० वाजता इंदापूर नगर परिषदेपासून निघाला. पुणे-सोलापूर महामार्गावरून तो थेट तहसील कार्यालयापर्यंत पोहोचणार होता. पक्षाचे नेते प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
तहसील कार्यालयात सातबारा, फेरफार, वारस नोंदी, जात व उत्पन्नाचे दाखले आणि रेशनकार्ड यांसारखी कामे रखडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने दुपारी १२ वाजता जुन्या मार्केट कमिटीजवळून तहसीलदारांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. तहसीलदार बनसोडे यांचे काम पारदर्शक असून त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप होत असल्याचा पक्षाचा दावा आहे.
या मोर्चामागील प्रमुख मागण्या दोन आहेत. SIR प्रक्रियेत खोटी माहिती देणाऱ्यांवर तहसीलदारांनी तातडीने गुन्हे दाखल करावेत, आणि भाजप नेत्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरील आरोप थांबवावेत.
वादाचे मूळ SIR प्रक्रियेत आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रार अर्जांवरून काही मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा मुद्दा राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
काँग्रेसने दोन्ही मोर्चांपासून अंतर ठेवले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मयुरसिंह पाटील यांनी सांगितले की पक्ष कोणत्याही मोर्चात सहभागी होणार नाही. “एका तहसीलदारासाठी तालुका किती वेठीस धरायचा,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तहसीलदार बनसोडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देऊन पारदर्शकपणे काम करणे हे आपले कर्तव्य आहे. काही कटू निर्णयांमुळे दुखावलेल्या राजकीय व्यक्तींनी आंदोलनाचा निर्णय घेतला असावा, असे ते म्हणाले. आंदोलन करणे हा त्यांचा हक्क असून आपण पारदर्शकपणे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे इंदापूर तालुक्यातील महायुतीमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे.