छत्रपती संभाजीनगर : घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शहरात आलेल्या फुलंब्री पोलिसांच्या पथकावर चौघांनी हल्ला केला आहे. यात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला.
ही घटना ११ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून ३० मिनिटांनी मिसारवाडी येथील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ घडली. पोलिसांनी ओळखपत्र दाखवूनही हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फुलंब्री पोलिस ठाण्याचे हवालदार कैलास प्रेमसिंग राठोड (वय ४२) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोखरी शिवारात ११ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता डायल ११२ वर चोरीचा कॉल आला होता.
समाधान तुपे, प्रवीण फुलाने आणि प्रीतम बोंगाडे यांच्या घरात घरफोडी झाली होती. चोरट्यांनी सोने आणि रोख रक्कम लांबवली होती. प्रीतम बोंगाडे यांची मोपेड (क्रमांक एमएच-20-डीए-7088) देखील चोरीला गेली होती.
तपासादरम्यान ही मोपेड मिसारवाडी-नारेगाव परिसरात दिसल्याची माहिती पथकाला मिळाली. पुढील मदतीसाठी ते एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याकडे खाजगी वाहनाने जात असताना अण्णाभाऊ साठे चौकाजवळ एक दुचाकी त्यांच्या वाहनाला जोरात धडकली.
दुचाकीवरील दोघे पडले. पोलिसांनी त्यांना उठवले, पण त्यांच्यात वाद सुरू झाला. पोलिसांनी ओळखपत्र दाखवल्यानंतरही रवी मिसाळ आणि यश मिसाळ यांनी सुनील सोनवणे यांची गच्ची पकडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
एकाने फोन करून साथीदारांना बोलावले. त्यानंतर आलेल्या दोघांनी रवी मिसाळला धक्का कोणी दिला, अशी विचारणा केली. मिसाळ यांनी सोनवणे यांच्याकडे बोट दाखवताच एकाने जिवे मारण्याची धमकी देत सोनवणे यांच्या डोक्यात दगड घातला.
हल्लेखोरांनी राठोड आणि नागलोद यांना देखील मारहाण केली आणि वाहनाची चावी हिसकावून घेतली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत पोलिसांची सुटका केली.
गंभीर जखमी सोनवणे यांना प्रथम चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
रवी मिसाळ, यश मिसाळ आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.