सोलापूर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढा व मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर झोन-१ पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ८५० किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे.
मुख्य मिठाई पुरवठादार मे. रंगोली स्वीट मार्ट (प्लॉट क्रमांक ०५, पिरजादे प्लॉट, अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील तपासणीत अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक, लेबलविषयक नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा व मानके नियमांतील अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन आढळून आले.
मिठाईचा दर्जा निकषांनुसार नसल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणाहून ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा, असा एकूण ८२९ किलो साठा जप्त झाला. नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
१३ नोव्हेंबर २०२६ रोजी मंदिर परिसरातील पेढा व प्रसाद विकणाऱ्या १२ दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी चार अनौपचारिक नमुने घेण्यात आले. सुमारे ७ हजार ३५० रुपये किमतीचा २१ किलो स्वीट हलवा जप्त करून नष्ट करण्यात आला.
यामध्ये सलीम मकानदार पेढा स्टॉल येथील ३ किलो आणि रंगोली स्वीट मार्ट येथील १८ किलो हलव्याचा समावेश आहे. वटवृक्ष स्वामी कृपा स्टोअर्स येथून लेमन पेढ्याचा नमुना घेण्यात आला. मंदिर परिसर आणि बेडर गल्लीतील अन्य विक्रेत्यांचीही तपासणी झाली.
चार आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात मे. समर्थ स्वीट स्टॉल, मे. पाटील स्वीट शॉप, मे. रंगोली स्वीट मार्ट आणि मे. सलीम मकानदार पेढा स्टॉल यांचा समावेश आहे.
मे. गुरुकृपा पूजा भंडार या आस्थापनेची नोंदणीही निलंबित करण्यात आली आहे.
कारवाई सहआयुक्त (अन्न) श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) एस. ई. देसाई तसेच अन्न सुरक्षा अधिकारी एखंडे व हिरेमठ यांच्या पथकाने केली.
अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी ही कारवाई 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रयोगशाळेचा अहवाल आल्याशिवाय मिठाईच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही.