लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) विमा व गुंतवणुकीच्या कथित 250 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी व्ही-केअर मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुमिता कौर यांना अटक केली आहे.
अनेक राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांचे नुकसान झालेल्या या प्रकरणाची नोंद लखनौतील कृष्णा नगर पोलीस ठाण्यात आहे. तपासादरम्यान कौर यांना झारखंडमधील रांची येथील अर्गोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. रांची न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवल्यानंतर त्यांना लखनौला आणण्यात आले आणि स्थानिक न्यायालयासमोर हजर केले.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कौर आणि कंपनीशी संबंधित अन्य व्यक्तींविरुद्ध उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि झारखंड या राज्यांत मिळून 26 फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
व्ही-केअर मल्टिट्रेड ही कंपनी 2008-09 मध्ये दिल्ली व हरियाणात नोंदली गेली होती आणि नंतर लखनौतील कृष्णा नगर भागात प्रादेशिक कार्यालय सुरू केले. कंपनीने ग्राहकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नामवंत विमा कंपन्यांच्या पॉलिसी घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नंतर ग्राहकांचा निधी अपहार करून कंपनीने कार्यालये बंद केली आणि फरारी पत्करली, असा ईओडब्ल्यूचा आरोप आहे.
कंपनी रेफरल आधारित मॉडेलही चालवत होती. नवे गुंतवणूकदार आणल्यास त्यांच्या दुसऱ्या वर्षाचा विमा हप्ता कंपनी भरेल, असे आश्वासन ग्राहकांना दिल्याचा आरोप आहे. या मॉडेलचा वापर ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी, कमिशन मिळवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा निधी वळवण्यासाठी केल्याचा संशय ईओडब्ल्यूला आहे.
अन्य आरोपींची भूमिका निश्चित करणे आणि कथितरीत्या गैरवापर केलेला निधी शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपीची अधिक चौकशी केली जाईल आणि गुन्हे दाखल असलेल्या राज्यांमध्ये कंपनीचा निधी कसा वळवला गेला, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात इतर आरोपींची भूमिका आणि कंपनीशी संबंधित अन्य व्यक्तींचा सहभाग याचाही तपास केला जात आहे. गुंतवणूकदारांना झालेल्या नुकसानीची भरपाई होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पुढे नेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सूचित केले.