ल्हासा : चीनच्या तिबेट (शिजांग स्वायत्त प्रदेश) मधील नाग्कू शहरातील बाचेन काउंटीत गुरुवारी रात्री 10.33 वाजता 7 तीव्रतेचा भूकंप झाला. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार या भूकंपात 16 जण ठार तर 32 जण जखमी झाले.
जखमींपैकी 11 जणांची प्रकृती गंभीर असून 21 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. 300 हून अधिक घरे कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकसानीचा अंदाज अद्याप सुरू आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू नाग्कूपासून सुमारे 190 किलोमीटर ईशान्येला तसेच प्रादेशिक राजधानी ल्हासापासून सुमारे 390 किलोमीटर ईशान्येला डोंगराळ भागात होता. केंद्रबिंदूची खोली सुमारे 10 किलोमीटर होती. भूकंपानंतर अनेक आफ्टरशॉक्स जाणवले.
हा भाग समुद्रसपाटीपासून सुमारे 4,800 मीटर उंचीवर आहे. कडाक्याची थंडी, दुर्गम रस्ते आणि उंच डोंगर यामुळे बचावकार्याला आव्हाने निर्माण झाली आहेत. रात्रीचे तापमान गोठवणारे असल्याने रहिवाशांनी तंबू व वाहनांत आश्रय घेतला.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्वशक्तीनिशी बचावकार्य करण्याचे, जखमींवर उपचार करण्याचे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले. पंतप्रधान ली छ्यांग यांनीही तातडीने मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले. 12,400 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राज्यमाध्यमांनुसार बचाव पथके, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. हा प्रदेश भूकंपप्रवण असल्याने येथील बचाव पथकांना डोंगराळ भागातील कामाचा अनुभव आहे. भूकंपानंतर पश्चिम चीनच्या किंघाई प्रांतातही 4.3 तीव्रतेचा एक भूकंप झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी आपत्कालीन प्रतिसादाची पातळी वाढवली असून राज्यस्तरावर आपत्ती प्रतिसाद सक्रिय करण्यात आला आहे. बचावासाठी 347 अग्निशमन कर्मचारी व 300 हून अधिक पोलीस तैनात आहेत. सुमारे 3,000 तंबू, 1,000 पूर्वनिर्मित घरे, दिवे व हिवाळी कपडे घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा भूकंप जानेवारी 2024 नंतर चीनमधील सर्वात तीव्र भूकंप असल्याचे मानले जात आहे. रस्ते व वीज खंडित झाल्याने काही गावांपर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे.