मुंबई : इवेको ग्रुपवर नियंत्रण मिळवल्यानंतर टाटा मोटर्सने मंगळवारी तुरिनमध्ये जागतिक पत्रकार परिषद घेऊन नव्या टप्प्याची सुरुवात केली. हा समूह आता जगातील चौथ्या क्रमांकाचा व्यावसायिक वाहन उत्पादक असून त्याची 130 हून अधिक देशांत पोहोच आहे.
टाटा सन्स, टाटा मोटर्स आणि इवेको ग्रुपचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, "टाटा मोटर्स आणि इवेको ग्रुपसाठी आज नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. दोन मजबूत आणि यशस्वी संस्था, समान मूल्ये आणि शाश्वत वाहतुकीच्या समान ध्येयाने एकत्र आल्या आहेत." लांब पल्ल्याची गुंतवणूक केली जाईल आणि क्षमता दोन्ही बाजूंकडून एकमेकांकडे वाहतील, असेही ते म्हणाले.
कंपनीच्या आकडेवारीनुसार एकत्रित महसूल सुमारे 21 अब्ज युरो, म्हणजे 2.28 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. वार्षिक विक्री सुमारे 5.9 लाख वाहनांची आहे. 27 उत्पादन प्रकल्प, 25 संशोधन केंद्रे आणि 9,300 हून अधिक विक्री व सेवा केंद्रे आहेत. सहा खंडांत 73,000 हून अधिक कर्मचारी काम करतात.
इवेकोचे मुख्यालय तुरिनमध्येच राहणार आहे. "इवेकोचे मुख्यालय तुरिनमध्ये होते आणि तुरिनमध्येच राहील. समूहाच्या भविष्याबद्दल मला शंका नाही," असे चंद्रशेखरन म्हणाले. इवेकोचा ब्रँड, संघ आणि औद्योगिक पायाभूत रचना स्वतंत्र ओळख टिकवून ठेवतील, असे कंपनीने स्पष्ट केले.
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश वाघ म्हणाले, "एकत्र येऊन ग्राहक आणि भागधारकांसाठी मोठे मूल्य निर्माण करण्याची असाधारण संधी आपल्यासमोर आहे."
इवेकोच्या नव्या संचालक मंडळात चंद्रशेखरन अध्यक्ष व वरिष्ठ गैर-कार्यकारी संचालक आहेत. ओलोफ पर्सन कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राहतील. पी. बी. बालाजी आणि गिरीश वाघ गैर-कार्यकारी संचालक, तर गुंटर बुचेक आणि चार्ल्स निकोल्स स्वतंत्र संचालक आहेत.
टाटा मोटर्सकडे इवेकोचे सुमारे 89.42 टक्के भांडवल आहे. प्रति शेअर 14.40 युरो या दराने 23.8 कोटीहून अधिक शेअर्ससाठी 42,561 कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली गेली. ज्या भागधारकांनी आतापर्यंत शेअर दिले नाहीत, त्यांच्यासाठी 2 ते 6 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची खिडकी पुन्हा उघडी आहे. त्या शेअर्सचे सेटलमेंट 13 नोव्हेंबरला होणार आहे.
ग्राहक करार, डीलर नेटवर्क, हमी आणि सेवा व्यवस्था पहिल्या दिवसापासून बदलणार नाहीत, असे कंपनीने सांगितले.