पुणे : पुणे मेट्रो लाईन ३ वर ११ नोव्हेंबरपासून दररोज सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. या गर्दीमुळे जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या स्थानकांवर पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसवली आहेत.
प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अडचण होऊ नये, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
सर्वाधिक वर्दळ जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर आहे. यापैकी जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक ही दोन स्थानके प्रवासी ओघाची केंद्रे बनली आहेत.
सध्या लाईन ३ वर २० गाड्या धावत असून दररोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. सेवा सुरू झाल्यापासून गाड्या सुमारे ९९ टक्के वेळेवर धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
"प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवाशांनी सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मेट्रोमुळे सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे," असे पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी सांगितले.
"हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही मेट्रोला पसंती देत आहेत. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे," असेही ते म्हणाले.
पुढील टप्प्यात बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र या दोन्ही स्थानकांची नेमकी तारीख कंपनीने जाहीर केलेली नाही.
लाईन ३ हा माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर असा २३.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गावरील १७ स्थानके सध्या प्रवाशांसाठी खुली आहेत. उर्वरित स्थानकांची कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून कामाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जाईल, असे कंपनीने सांगितले.