नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत खाते असल्याचा भास निर्माण करून नागरिकांची दिशाभूल करणारे बनावट इन्स्टाग्राम खाते नाशिक शहर सायबर पोलिसांच्या सायबर पेट्रोलिंगमध्ये उघडकीस आले आहे. या प्रकरणी संबंधित खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याचे सायबर पेट्रोलिंग पथक सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवत असते. १५ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग सुरू असताना इन्स्टाग्रामवर 'official.kumbhnagari_nashik' या नावाने एक खाते कार्यरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या खात्याची तपासणी केली असता त्यावरून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कार्यक्रमांसंदर्भात रील्स आणि पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचे आढळले. खात्याचे नाव आणि स्वरूप पाहता ते 'सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक' या शासकीय कार्यालयाचे अधिकृत खाते असल्याचा भास निर्माण होत होता.
या खात्यामार्फत भाविक आणि नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी कारवाई केली.
नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हे खाते नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने तयार केले, याचा शोध सायबर पोलिसांचे पथक तांत्रिक तपासाच्या आधारे घेत आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या वतीने नागरिकांना आवाहन केले आहे की, आगामी सिंहस्थ कुंभमेळा किंवा शासनाच्या इतर कोणत्याही योजना व कार्यक्रमांच्या माहितीसाठी केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आणि प्रमाणित सोशल मीडिया हँडलवरच विश्वास ठेवावा.
बनावट किंवा संशयास्पद सोशल मीडिया खाते आढळल्यास तातडीने नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. यासाठी ९९२३३२३३११ हा सीपी व्हॉट्सॲप क्रमांक आणि ११२ ही आपत्कालीन हेल्पलाइन उपलब्ध केली आहे. सायबर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक (०२५३) २३०५२२६ आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील बनावट खात्यांपासून सावध राहण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे.