मुंबई : प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानस्थित समर्थकाशी कथित संबंध आणि संस्थापक मसूद अझहर यांचा व्हिडीओ पसरवल्याप्रकरणी अटक झालेल्या गोवंडी येथील २२ वर्षांच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा डीफॉल्ट जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.
विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी सोमवारी हा अर्ज फेटाळला. तपास यंत्रणेने विस्तारित कायदेशीर कालावधीत आरोपपत्र दाखल केले आहे आणि आरोपीने बेकायदेशीर अटकेवर सुटका मिळवण्यासाठी घटनात्मक व कायदेशीर सुरक्षा उपायांचा भंग सिद्ध केलेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
आरोपीचे नाव आयान युसूफ शेख असे आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ४ मार्चला गोवंडी, शिवाजी नगर आणि कुर्ला येथे तीन ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्याला अटक केली होती.
तपासकर्त्यांच्या मते, शेखने मसूद अझहर यांचा व्हिडीओ अनेक जणांना पाठवला होता. त्यात झीशान नियाज अहमद खान आणि अरहम अहमद शेख या दोन मित्रांचाही समावेश आहे. त्यांची उपकरणेही तपासणीसाठी जप्त करण्यात आली.
जामीन अर्जात शेखच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याला हजेरीच्या नोटिसेच्या आड बेकायदेशीर ताब्यात घेतले, अटकेचे कायदेशीर उपाय पाळले गेले नाहीत आणि त्यानंतरच्या रिमांड आदेशांनी बेकायदेशीर अटकेला वैधता देऊ शकत नाही. ९० दिवसांचा कायदेशीर कालावधी संपला असून तपास यंत्रणेला दिलेली मुदतवाढ कायदेशीररीत्या टिकाऊ नाही, असेही त्यांनी सांगितले.
सरकारी वकिलांनी मात्र असा युक्तिवाद केला की ४ मार्चला नोटिस दिल्यानंतर शेखला चौकशीसाठी एटीएस कार्यालयात नेले आणि रात्री ८.०५ वाजता औपचारिक अटक केली. अटकेची माहिती शेखला व त्याच्या कुटुंबीयांना दिली, अटकेची कारणे व्हॉट्सअॅपवर कळवली आणि राहत्या घरी लेखी कळवले.
आरोपपत्र दाखल झाल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेंशन) कायद्यानुसार तपासाचा कालावधी ९० दिवसांवरून १८० दिवसांपर्यंत वाढवता येतो, असे न्यायालयाने नमूद केले. २६ मे रोजी ४५ दिवस आणि १५ जुलै रोजी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.