इंफाळ : इंफाळ पूर्वेतील सुनुरोक येथे लाकूड गोळा करत असलेल्या तीन मेइतेई नागरिकांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या 48 तासांच्या राज्यव्यापी बंदचा मंगळवारी दुसरा दिवस उलटला. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, ठोबल व काकचिंग या पाच खोऱ्यातील जिल्ह्यांत बाजारपेठा, शाळा व कार्यालये बंद होती, तर सार्वजनिक वाहतूक ठप्प होती.
दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचार थांबलेला नाही. मंगळवारी कांगपोकपी जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी 45 वर्षीय कुकी तरुणाला गोळी घालून ठार केले, तर उखरूलमध्ये सुमारे सहा कुकी घरे जाळण्यात आली. गेल्या 48 तासांत उयुमपोक, नोंगशुम व ठोबल भागात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या बंदचे नेतृत्व नेटिव्ह पीपल्स कमिटी मणिपूर (NPCM) करत आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्या सशस्त्र गटांविरुद्ध कारवाई, खोंगबल तांगखुल व खामेनलोक परिसरातील बेकायदेशीर सशस्त्र तळ हटवणे आणि ठराविक कालावधीत पारदर्शक चौकशी या त्यांच्या मागण्या आहेत. उपमुख्यमंत्री नेम्चा किपगेन यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
सोमवारी दुपारी माजी मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंग यांच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांना भेटून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली. आवश्यकता भासल्यास पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांना भेटण्याची व्यवस्था करण्याचा सल्लाही इबोबी यांनी दिला. मात्र बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही.
2023 पासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात मणिपूरमध्ये किमान 306 जणांचा मृत्यू झाला आहे.