मुंबई, २२ मे: भविष्यातील परिवर्तनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे सर्वांत शक्तिशाली माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची गरज आहे. ‘मुंबई टेक वीक’सारख्या उपक्रमांमधून AI च्या संधी तरुणांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोपक्रमाचे अग्रगण्य केंद्र म्हणून पुढे येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
सह्याद्री अतिथिगृहात आज ‘मुंबई टेक वीक’ (MTW) २०२६ ची घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुंबई टेक एन्ट्रप्रेन्युअर्स असोसिएशन (TEAM) यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित केलेला हा कार्यक्रम आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या पाठबळाने आणि मेटाच्या सह-पाठबळाने २९ व ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. ‘इंडिया: AI इन ॲक्शन’ या संकल्पनेवर आधारित मुंबई टेक वीक २०२६ मध्ये विविध क्षेत्रांत AI च्या प्रत्यक्ष उपयोगांचे प्रदर्शन होणार असून, त्यात मेटा, ॲन्थ्रॉपिक, ओपनएआय, गूगल क्लाउड आणि नेसा यांसारख्या कंपन्या सहभागी होतील. या प्रसंगी ‘मुंबई टेक वीक’चा लोगोही प्रकाशित करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन विविध विभागांमध्ये AI चा वापर करत असून त्यामुळे प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. “या परिवर्तनात शासन सर्वांत मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे.” ‘मुंबई टेक वीक’सारख्या व्यासपीठांमुळे AI विषयीचे अनुभव जनतेपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमादरम्यान शासनाच्या AI उपक्रमांची अनुभवाधिष्ठित सादरीकरणे आयोजित करण्याची सूचनाही केली. TEAM ची वाढती व्याप्ती पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि या उपक्रमाशी तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण व व्यावसायिक मोठ्या संख्येने जोडले जात असल्याची ही सकारात्मक बाब असल्याचे सांगितले. AI क्षेत्रातील नवोपक्रम व औद्योगिक वाढीला राज्य शासन सदैव ठामपणे पाठिंबा देत राहील. गेल्या वर्षीपेक्षा मोठा आणि अधिक प्रभावी ‘मुंबई टेक वीक’ आयोजित करू या आणि महाराष्ट्रातील तरुणांना AI क्षेत्रातील नव्या संधींशी जोडू या, जेणेकरून त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध होतील, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
‘मुंबई टेक वीक’विषयी बोलताना TEAM चे सह-अध्यक्ष आणि प्रशासकीय परिषदेचे सदस्य हर्ष जैन म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याबद्दल आणि मुंबई टेक वीकच्या संकल्पनेवरील त्यांच्या विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. मुंबई टेक एन्ट्रप्रेन्युअर्स असोसिएशन (TEAM) यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या पाठबळाने आणि मेटाच्या सह-पाठबळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम २९ व ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. ‘इंडिया: AI इन ॲक्शन’ या संकल्पनेखाली मुंबई टेक वीक २०२६ मध्ये मेटा, ॲन्थ्रॉपिक, ओपनएआय, गूगल क्लाउड आणि नेसा यांसह कंपन्या विविध क्षेत्रांतील AI चे व्यावहारिक उपयोग दाखवतील. MTW 2026 केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून AI उद्योगांमध्ये कसे परिवर्तन घडवत आहे आणि वास्तविक आर्थिक संधी कशा निर्माण करत आहे, हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी आखण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई हे त्यासाठी आदर्श ठिकाण आहे. महाराष्ट्र शासन आमचे भागीदार असल्याने मुंबई आणि महाराष्ट्राच्या AI अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.”
हर्ष जैन पुढे म्हणाले की, AI प्रदर्शनांखेरीज ‘मुंबई टेक वीक’मध्ये ‘AI एक्सलन्स पुरस्कार २०२६’, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप शोकेस आणि AI आधारित रोजगार मेळावाही होईल. रोजगार मेळाव्यात २५ हून अधिक कंपन्या भरती मोहीम राबवतील, ज्यातून ३० हजारांहून अधिक उमेदवारांसाठी २५० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध होतील. याशिवाय मास्टरक्लास आणि ‘Stories Unplugged’ सत्रेही आयोजित केली जातील. मुख्य कार्यक्रमापूर्वी वातावरणनिर्मितीसाठी मुंबईत १४ सॅटेलाइट उपक्रम आयोजित केले जातील, जेणेकरून परिसंस्थेचा व्यापक सहभाग सुनिश्चित होईल.
मुंबई टेक एन्ट्रप्रेन्युअर्स असोसिएशन (TEAM) विषयी
मुंबई टेक एन्ट्रप्रेन्युअर्स असोसिएशन (TEAM) ही स्वतंत्र, ना-नफा तत्त्वावर काम करणारी उद्योग संघटना असून मुंबईची तंत्रज्ञान परिसंस्था विकसित आणि बळकट करण्याचे काम करते. प्रख्यात संस्थापक आणि उद्योगक्षेत्रातील नेत्यांचा समावेश असलेल्या प्रशासकीय परिषदेकडून संघटनेचे नेतृत्व केले जाते. यात हर्ष जैन, आकृत वैश, नैय्या सग्गी, ध्रुविल संघवी, आकांक्षा हजारी, विशाल गोंडल, मयंक कुमार आणि विवेक खेमका यांचा समावेश आहे. मुंबईतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे विविध क्षेत्रांत प्रतिनिधित्व करणारी ही संघटना संस्थापक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांसोबत जवळून काम करत मुंबईला भारताचे अग्रगण्य तंत्रज्ञान नवोपक्रम आणि AI-आधारित औद्योगिक वाढीचे केंद्र बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण) कौस्तुभ धवसे, TEAM प्रशासकीय परिषदेचे सह-अध्यक्ष आणि संस्थापक आकृत वैश, TEAM प्रशासकीय परिषदेचे सह-अध्यक्ष हर्ष जैन आणि प्रशासकीय परिषदेचे सदस्य तसेच मार्केटिंग क्षेत्रातील संस्थापक नैय्या सग्गी उपस्थित होते.

