बंगळुरू : इस्रो 27 ते 29 ऑक्टोबरला नवी दिल्लीत होणाऱ्या इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (ESTIC) 2026 मध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रदर्शित करणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी बंगळुरूत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रदर्शनात 30,000 किलोपेक्षा जास्त वजनाचा भार निम्न पृथ्वी कक्षेत नेण्यास सक्षम अशा प्रस्तावित पुढील पिढीच्या हेवी लिफ्ट प्रक्षेपक यानाचे प्रतिरूप मांडले जाईल.
तसेच अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची कल्पना असलेल्या चांद्रयान 4 व चांद्रयान 5 प्रकल्पांची माहितीही प्रदर्शनात असेल. हे काम 2040 पर्यंत पूर्ण करायचे आहे, असे नारायणन म्हणाले.
परिषदेत मानवी अंतराळ उड्डाण मोहीम गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक या भावी प्रकल्पांवरही चर्चा होईल. विकसित भारत 2047 साठी अंतराळ क्षेत्राचा दृष्टिपत्रही या परिषदेत सादर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
देशांतर्गत उद्योग व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना कार्यरत प्रक्षेपक याने व उपग्रह बनवण्याचे काम देऊन खासगी सहभाग वाढवण्याचा इस्रोचा मानस आहे. त्यामुळे इस्रो प्रगत संशोधन व मोहिमांवर लक्ष केंद्रित करू शकेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अंतराळ क्षेत्राचे खासगीकरण होत नसल्याचे इस्रोने आधी स्पष्ट केले आहे.