शासकीय पदांवर काम करताना केवळ नोकरी म्हणून न पाहता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अंतःकरणापासून सेवाभाव जपा, असा स्पष्ट आणि कळकळीचा संदेश उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय यंत्रणेला दिला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि विविध विभागांच्या वतीने राबवण्यात आलेल्या 'सेवा संकल्प अभियाना'चा सांगता समारंभ ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात संपन्न झाला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, शेती आणि समाजकल्याण विभागांच्या समन्वयातून तब्बल १,०५६ उपक्रम यशस्वीपणे पार पडले असून हजारो गरजू नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळाला.
कार्यक्रमाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे अभियान म्हणजे एका मर्यादित कालावधीपुरता चालणारा उपक्रम नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर आधारित ही निरंतर चालणारी जनसेवेची चळवळ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथाचा संदर्भ देत त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले की, वर्षातील काही दिवस केवळ ‘सौजन्य सप्ताह’ साजरा करून नंतर नागरिकांना फेऱ्या मारायला लावणे योग्य नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी कायम सौजन्याने आणि आत्मीयतेने वागले पाहिजे. नवरात्रीच्या शक्तिपर्वाचे औचित्य साधत शासकीय योजनांचा हा प्रवाह प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत अखंडितपणे पोहोचला पाहिजे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दुर्गम आदिवासी भागातील प्रशासकीय पोहोच अधोरेखित करताना शिंदे यांनी मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यांमधील 'घोंगडी बैठकां'चे विशेष कौतुक केले. कोणत्याही कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीअभावी आदिवासी व ग्रामीण बांधव वंचित राहू नयेत, यासाठी अधिकारी स्वतः पाड्यांवर गेले. या अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक दाखले वाटप, शालेय साहित्याचे वाटप यासोबतच ‘बिरसा मुंडा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन’ योजना थेट बांधावर पोहोचवण्यात आल्या. दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी ग्रामीण जनतेला आधार देण्यासोबतच शहरातील संस्थांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या सांगता सोहळ्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीच्या (DMFT) माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेतील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले, तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी अभियानाच्या यशाचा लेखाजोखा मांडला, तर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
