नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले अकवान चक्रीवादळ २० नोव्हेंबरला दुपारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. नेल्लोर ते तुनी दरम्यानचा किनारा सर्वाधिक धोक्यात असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
सोमवारी संध्याकाळी आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि त्याला लागून असलेल्या नैऋत्य भागात तयार झालेले गडद दाबाचे क्षेत्र 'अकवान' या चक्रीवादळात रूपांतरित झाले. १९ नोव्हेंबरपर्यंत ते 'अति तीव्र चक्रीवादळ' होण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर धडकताना वाऱ्याचा सततचा वेग १२० ते १३० किमी प्रतितास आणि झोक्यांचा वेग १४५ किमी प्रतितासांपर्यंत पोहोचू शकतो.
या वादळाला इराणने नाव दिले आहे. या वर्षी उत्तर हिंदी महासागरात तयार झालेले हे तिसरे चक्रीवादळ आहे.
ओडिशा सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे. राज्यात ७४ बचाव पथके तैनात करण्यात आली असून किनारपट्टीवरील भागांतून लोकांचे स्थलांतर सुरू आहे.
दरम्यान, ओडिशा किनाऱ्याजवळ 'एमव्ही विश्वा उदय' या मालवाहू जहाजाचे तांत्रिक बिघाडामुळे इंजिन बंद पडले. परादीप बंदर प्राधिकरण आणि भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त मोहिमेत जहाजावरील सर्व २७ खलाशांची सुखरूप सुटका झाली.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातही यंत्रणा सतर्क केल्या आहेत. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मासेमारी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात मात्र हवामान विभागाने मुसळधार पावसाचा किंवा थंडीच्या लाटेचा इशारा दिलेला नाही. पुणे, नाशिक, जळगाव व अहिल्यानगर येथे सकाळी थंडी जाणवेल, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे हवामान कोरडे राहील.
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर व गोंदिया आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड व धाराशिव येथेही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
अकवानच्या दिशेबाबत हवामान विभाग सतत अद्ययावत माहिती देत असून किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, दिल्लीत मंगळवारी सकाळी हवेची गुणवत्ता 'खराब' श्रेणीत २४२ वर होती. वाऱ्याचा वेग कमी होत असल्याने ती 'अत्यंत खराब' होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.