मुंबई : प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात १५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या 'चित्रपताका' मराठी चित्रपट महोत्सवात सोमवारी सिनेरसिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने हा महोत्सव होत आहे.
दुसऱ्या दिवशी १२ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन झाले. सकाळच्या सत्रात 'घरत गणपती', 'श्री गणेशा' आणि 'गारूड' दाखवण्यात आले. दुपारच्या सत्रात 'सांगत्ये ऐका'सह 'सांगळा' आणि 'नवरदेव बीएस्सी अॅग्री' दाखवण्यात आले. त्यानंतर 'स्नो फ्लॉवर', 'जारण' आणि 'फुलवंती' आली. सायंकाळच्या सत्रात 'दशावतार', 'श्यामची आई' आणि 'सिनेमॅन' सादर झाले.
'हाच माझा मार्ग...' या विशेष सत्रात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मुलाखत घेण्यात आली. वरिष्ठ सिनेपत्रकार अमित भंडारी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
बालकलाकार म्हणून सुरू झालेली कारकीर्द ते नायकापर्यंतचा प्रवास, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभव, दिग्दर्शनाची वाटचाल आणि चित्रपट निर्मितीतील अनुभव यावर या मुलाखतीत चर्चा झाली.
'पुस्तक ते सिनेमा' या उपक्रमातून साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला. चित्रपट किंवा वेबमालिकांमध्ये रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या प्रकाशित मराठी पुस्तकांच्या लेखकांना आपल्या साहित्यकृती थेट चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखकांसमोर मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
दोन कार्यशाळा झाल्या. 'अथातो सिनेजिज्ञासा'मध्ये सिनेअभ्यासक मिलिंद दामले यांनी सिनेमाचे माध्यम, त्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये यांची माहिती दिली. प्रसिद्ध ध्वनीसंकलक मंदार कमलापूरकर यांनी 'स्वर-नाद-निनाद'मध्ये चित्रपटातील ध्वनी व संगीत संयोजनाची ओळख करून दिली.
'गावकुसातला मराठी सिनेमा' या परिसंवादात दिग्दर्शक हरीश इथापे, मंगेश बदर, रावबा गजमल, शेखर रणखांबे आणि विजय कळमकर यांनी आपले अनुभव मांडले. 'तिचं नायिका होणं!' या परिसंवादात अभिनेत्री वर्षा उसगांवकर, छाया कदम आणि सायली संजीव यांनी आपल्या प्रवासाविषयी बोलल्या.
मंगळवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी 'लग्नकल्लोळ', 'कुर्ला टु वेंगुर्ला', 'आता थांबायचं नाय!', 'देऊळबंद २', 'उत्तर', 'पिंजरा', 'तिघी', 'तुंबाडची मंजुळा', 'तू मी आणि अमायरा', 'मॅगझिन', 'स्वरगंधर्व सुधीर फडके' आणि 'मु. पो. बोंबिलवाडी' हे १२ चित्रपट दाखवले जाणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखतीही मंगळवारी होणार आहेत.