गुवाहाटी : मतदार याद्यांच्या विशेष सर्वंकष फेरतपासणीला (एसआयआर) अरुणाचल प्रदेश भाजपने पाठिंबा दिला आहे. 'अवैध स्थलांतरित' येण्याची चिंता असल्याने अचूक मतदार यादी आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
राज्यात २६ प्रमुख जमाती आणि १२० हून अधिक उपजमाती आहेत. काहींची लोकसंख्या काही हजारांचीच आहे. या समुदायांपैकी बहुतांश जमाती एसआयआरकडे आपली जमीन, संस्कृती आणि ओळख वाचवण्याचे कवच म्हणून पाहतात. संख्येने मोठ्या 'बाहेरच्या' लोकांपासून संरक्षण हा त्यांचा सूर आहे.
पूर्व कामेंग जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पक्ष बैठकीत बोलताना भाजपचे राज्य सरचिटणीस तादर निगलार यांनी अचूक व अद्ययावत मतदार यादी ठेवण्यासाठी एसआयआरचे महत्त्व अधोरेखित केले. 'मतदार यादीची फेरतपासणी ही नियोजित प्रक्रिया आहे, तिला मनमानी कारवाई म्हणून चित्रित करू नये. एसआयआरमधील प्रक्रियात्मक खात्री पडताळणी, पारदर्शकता आणि अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी पात्र मतदारांना दावे किंवा हरकती मांडण्याची संधी यांचे महत्त्व दर्शवते,' असे ते म्हणाले.
आसामच्या सीमेलगतच्या भागात अनुसूचित जमाती (एपीएसटी) आणि अनुसूचितेतर (नॉन-एपीएसटी) यांच्यात तणाव राहिला आहे. बौद्ध चकमा आणि हिंदू हाजाँग वस्ती असलेल्या भागांत एसआयआरच्या वेळीही तणावाचा टप्पा आला. पूर्व पाकिस्तान, आताच्या बांगलादेशातून विस्थापित होऊन १९६० च्या दशकात हे समुदाय येथे स्थायिक झाले होते.
कॉकरोच जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने केलेल्या आंदोलनांवरही निगलार यांनी टीका केली. त्यांच्या 'विघ्नकारक कृती' राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे ते म्हणाले.