मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
राजकारणमहाराष्ट्र

१० महिन्यांनी ठाणे स्थायी समितीचा मार्ग मोकळा; आज १६ सदस्यांची निवड

ठाणे महापालिकेत नऊ महिन्यांपासून रखडलेली स्थायी समिती शुक्रवारी अस्तित्वात येणार आहे. महासभेत १६ सदस्य निवडले जातील. शिंदे सेनेचे ९, भाजपचे ३, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रत्येकी १ आणि एमआयएमचा १, असं गणित आहे.

· · १ मिनिटाचे वाचन

ठाणे : महापालिकेची निवडणूक होऊन १० महिने उलटल्यानंतर अखेर ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवड शुक्रवारी होत आहे. दुपारी होणाऱ्या महासभेत समितीच्या १६ सदस्यांची निवड केली जाईल.

नगरसेवकांच्या संख्याबळानुसार शिंदे सेनेचे ९, भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा १ आणि एमआयएमचा १ असे सदस्य निवडले जाण्याची शक्यता आहे.

यापैकी एका जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात चुरस असल्याचे सांगण्यात येते. या जागेचे वाटप अद्याप निश्चित झालेले नाही.

निवड झालेल्या सदस्यांना सुरुवातीला केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यानंतर सर्व पक्षांच्या सहमतीने कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.

स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक नोव्हेंबरअखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने सभापती पद त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता जास्त आहे.

ठाणे महापालिकेत शिंदे सेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९, एमआयएमचे ५, ठाकरे सेनेचा १ आणि अपक्ष १ असे १३१ नगरसेवक आहेत.

स्थायी समिती ही महापालिकेच्या आर्थिक निर्णयांवर नियंत्रण ठेवणारी समिती आहे. ती नसल्याने अनेक प्रस्ताव लांबणीवर पडले होते.

या विलंबाविरोधात अधिवक्ता सागर कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १२ ऑक्टोबरला न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने आठ आठवड्यांत स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती, परिवहन समिती आणि अन्य समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

स्थायी समितीबरोबरच १० स्वीकृत नगरसेवक आणि परिवहन समितीची निवडही प्रलंबित आहे. या निवडींचाही मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे.

गटनेत्यांनी आपल्या वाट्याच्या सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांना सुपूर्द करायची प्रक्रिया आहे. महासभेत नावांची घोषणा होताच समितीच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल.

निवडीची प्रक्रिया महासभेतच पूर्ण होणार असल्याने आजचा दिवस महापालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे.