चंदिगड : दिल्ली विमानतळावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना सुमारे तीन तास थांबवून ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, असा आरोप आम आदमी पक्षाने मंगळवारी केला. ही जाणूनबुजून केलेली अवमानना असल्याचा दावा पक्षाने केला.
आपचे प्रवक्ते बलतेज पन्नू यांनी व्हिडीओ निवेदनात सांगितले की, मान पॅरिसहून परतत होते, तेव्हा विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांचे सामान आलेले नाही किंवा तपासणी सुरू आहे, असे कारण पुढे करून थांबवले. जवळपास तीन तासांनंतर अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे आले आणि 'वरून प्रचंड दबाव' असल्याचे सांगितले. त्यानंतर ५० हजार रुपयांचा दंडाचा चलन देण्यात आला.
पन्नू म्हणाले की, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खाद्य महोत्सवात पंजाबच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी मान पॅरिसला गेले होते. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही भेट होती आणि मुख्यमंत्र्यांना योग्य प्रोटोकॉल देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र पॅरिसमधील कौन्सुल जनरल त्यांच्या भेटीला आले नाहीत.
केंद्र सरकार मान यांच्या परदेश दौऱ्यांना वारंवार अडवत असून किमान चार वेळा परवानगी नाकारली गेली, असाही आरोप पन्नू यांनी केला. ही घटना 'पंजाबविरोधी' भूमिकेचा पुरावा असल्याचे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर राज्याच्या सन्मानाची हेळसांड केल्याचा आरोप केला.
या आरोपांवर केंद्र सरकार किंवा दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून तात्काळ प्रतिक्रिया आलेली नाही.
पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक आहे. अमली पदार्थांचा प्रश्न भाजपने निवडणुकीचा मुख्य मुद्दा केला आहे, तर आप केंद्रावर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारवर दबाव आणल्याचा आरोप करत आहे. मान यांच्या परदेश दौऱ्यांमुळे पंजाबला गुंतवणूक मिळण्याची भीती केंद्राला वाटते, असे पन्नू म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी गेल्या महिन्यात 'नशा मुक्त पंजाब यात्रे'ला हिरवा झेंडा दाखवला होता, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जलंधरच्या सभेत २०२९ अखेरपर्यंत पंजाब नशामुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.