पुणे : मुंबईतील कार्यालयात सोने आणि रोकड सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी सोपवलेली सुमारे २८ लाख रुपयांची पिशवी घेऊन कुरिअर बॉयनेच पलायन केल्याचा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. तो पकडण्यासाठी पोलिसांना सलग २५ दिवस आणि सुमारे १० हजार किलोमीटरचा पाठलाग करावा लागला.
तक्रारदार जितेंद्र ऋषिकेश सिंह यांच्याकडे विशाल सत्यपाल चौहान (वय २०, रा. मिसा कलान, जिल्हा एटा, उत्तर प्रदेश) कुरिअर बॉय म्हणून काम करत होता. सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी लागणारे सोने, सोन्याची बिस्किटे आणि मजुरीसाठी लागणारी रोकड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम त्याच्याकडे होते. त्यानुसार त्याला सुमारे २८ लाख रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असलेली पिशवी देण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर विशालने ठरलेल्या ठिकाणी न जाता वेगळा मार्ग पकडला आणि पिशवीसह पलायन केले. बराच काळ उलटूनही तो कार्यालयात पोहोचला नाही आणि त्याच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. त्यानंतर खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जहागड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी आणि नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळाली.
आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने पथकाला उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज व गौतमबुद्धनगर तसेच उत्तराखंडमधील देहरादून येथे तीन वेळा स्वतंत्र शोधमोहीम राबवावी लागली. या प्रकरणात विशालसह विकासकुमार जाधोन, ब्रिजेश सुरेंदरसिंग चौहान आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने आपल्या भावाच्या डोक्यावरील सुमारे १५ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी साथीदारांच्या मदतीने कट आखल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींच्या घरांच्या झडतीत मुद्देमालाचा मोठा भाग हस्तगत झाला. विकासकुमार जाधोन याच्या घरातून १६ लाख ८० हजार रुपये किमतीची, १२० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे जप्त करण्यात आली. ब्रिजेश चौहान याच्या घरातून ७ लाख रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी आणि चांदीची साखळी हस्तगत करण्यात आली. आतापर्यंत एकूण २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून उर्वरित ऐवजाचा शोध सुरू आहे.