मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रमहाराष्ट्र

जातीच्या जिवावर मोठ्या होणाऱ्या नेत्याला भविष्य नाही: भगवान गडावर पंकजा मुंडेंचा इशारा

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात जातकेंद्रित राजकारणावर टीका केली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गाव दत्तक घेण्याची घोषणाही त्यांनी केली.

· · २ मिनिटांचे वाचन
जातीच्या जिवावर मोठ्या होणाऱ्या नेत्याला भविष्य नाही: भगवान गडावर पंकजा मुंडेंचा इशारा

बीड : जातीपातीच्या जिवावर राज्य करू इच्छिणारा नेता आणि याच आधारावर मोठा होऊ पाहणारा माणूस या देशात कधीच पुढे जाऊ शकत नाही, असा सरळ इशारा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दिला. पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील श्रीक्षेत्र भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. हा मेळावा यंदा बाराव्या वर्षात पोहोचला.

मेळाव्याला दाखल झाल्यावर मुंडे यांनी भगवानबाबांचे पूजन व आरती केली आणि हाती ध्वज घेऊन उपस्थितांचे अभिवादन केले. व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार मोनिका राजळे, आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

'माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले, तरी तुमचे उपकार फिटू शकत नाहीत. हा दुष्काळातला मेळावा आहे. सीएसआर फंडातून चारा पोहोचवणे आणि अनुदानासाठी मी तुमची सावली बनून काम करीन,' असे मुंडे म्हणाल्या.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. 'दुष्काळ कोणीही लहान किंवा मोठा नसतो. पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न सर्वांसाठी सारखाच असतो,' असे सांगत त्यांनी जातीधर्माच्या भिंती मोडून काढून एकजुटीने दुष्काळाला तोंड देण्याचे आवाहन केले.

मेळाव्यातील ठळक घोषणा होती — जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गाव मुंडे यांनी दत्तक घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या या गावाचा विकास बीडमधील गावांसारखाच करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 'माझ्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावाइतकेच प्रेम मी अंतरवलीवर करणार आहे,' असे त्यांनी सांगितले.

तरुण पिढीला त्यांनी थेट सल्ला दिला. आजची तरुणाई जेन झी आहे; तिचे नेतृत्व मुद्याने व्हायला हवे, गुद्याने नाही. देश किंवा घर जाळून आंदोलन करणारे तरुण नकोत, तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे देश पुढे नेणारे सैनिक हवेत, असे त्या म्हणाल्या.

आमदार धनंजय मुंडे यांनीही आपल्या खास शैलीत विरोधकांना इशारा दिला. 'काही मैफली माझ्या तबाहीसाठी बसल्या आहेत, पण त्यांना अजून ठाऊक नाही की आता वाऱ्याची दिशा बदलत आहे,' असे ते म्हणाले.

आपली वाटचाल कुठे आहे, याचे संकेत देताना पंकजा मुंडे म्हणाल्या — 'भीड में खडा होना मेरा मकसद नहीं है, बल्की भीड जिसके लिए खडी होती है वह बनना है.'