मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
गुन्हेगारीमहाराष्ट्र

कालापिला जुगाराचा अड्डा फोडला; गुन्हे शाखेच्या छाप्यात 13 जण ताब्यात

नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात दुप्पट पैशांच्या आमिषाने कालापिला जुगार खेळवणाऱ्या टोळीवर छापा. 13 जण ताब्यात, 3.41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणूक व जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा.

· · १ मिनिटाचे वाचन

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या जुगार टोळीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 3.41 लाख रुपये किमतीचा रोख व जुगार साहित्य जप्त झाले आहे.

हवालदार संदीप भांड आणि उत्तम पवार यांना 13 नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संतोष गुदणे, भुय्या मामू उर्फ फिरोज, अशफाक शेख, शब्बीर आणि हुसेन यांच्या नेतृत्वाखालील टोळी स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना तीनपत्ती व कालापिला खेळात ओढून हातचलाखीने पैसे कमावत होती, असे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या नेतृत्वात पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी वेशांतर करून रेल्वे स्थानक, बसस्थानक, जवळची हॉटेले आणि परिसरात सापळा रचला. रात्री 11.41 वाजता छापा टाकून 13 जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच पाच ते सहा जण पसार झाले.

ताब्यात घेतलेल्यांमध्ये मुंबई, ठाणे, अहमदाबाद, चिपळूण आणि छत्रपती संभाजीनगर येथील व्यक्तींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात जुगाराची पद्धत नियोजनबद्ध असल्याचे समोर आले. टोळीतील काही सदस्य ग्राहक बनून सुरुवातीला पैसे लावत असत आणि ठरल्याप्रमाणे जिंकत, त्यामुळे इतरांचा विश्वास संपादन होत असे.

पुढे हातचलाखीने पैसे जिंकून नागरिकांची फसवणूक केली जात होती. या जुगारासाठी कोलकात्याहून राज्यातील विविध ठिकाणी माणसे पुरवली जात असल्याची माहितीही तपासात समोर आली. संबंधितांना पाच टक्के कमिशन दिले जात असे. नाशिकमध्ये माणसे बोलावणे, पैशांचे वाटप, वाद मिटवणे आणि संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. फरार साथीदारांचा शोध सुरू असून जुगाराचे जाळे व त्यामागील आर्थिक व्यवहारांची चौकशी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक करत आहे.