मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
राजकारणमहाराष्ट्र

पश्चिम उपनगरात सणांच्या नावावर बॅनरबाजी, 'बॅनरमुक्त करा' मागणी तीव्र

दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छांच्या नावाखाली वांद्रे ते दहिसर पट्ट्यात राजकीय फलकांची लगबग सुरू आहे. सार्वजनिक जागा, शहराचे सौंदर्य आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बॅनरमुक्त उपनगराची मागणी होत आहे.

· · १ मिनिटाचे वाचन

मुंबई : वांद्रे ते दहिसर पट्ट्यात दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छांच्या नावाखाली राजकीय फलकांची लगबग सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवरील प्रमुख रस्ते, सिग्नल, पदपथ, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे या फलकांनी भरली आहेत.

गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात सर्वपक्षीय नेते, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शुभेच्छा फलक ठिकठिकाणी लागले आहेत. काही ठिकाणी एकाच परिसरात वेगवेगळ्या पक्षांचे, गटांचे आणि नेत्यांचे अनेक फलक शेजारीशेजारी झळकत आहेत. त्यामुळे काही चौक आणि रस्ते फलकांनी व्यापल्याचे चित्र दिसते.

शुभेच्छा देऊन नागरिकांपर्यंत पोहोचण्याची राजकीय धडपड यात दिसत असली, तरी या बॅनरबाजीमुळे सार्वजनिक जागांचा वापर, शहराचे सौंदर्य आणि वाहतुकीची सुरक्षितता यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बॅनरबाजीमुळे शहरात विद्रूपीकरण होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पालिका प्रशासनाने सर्व बॅनर काढून पश्चिम उपनगर बॅनरमुक्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणांवरील फलकांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, असे वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. गांड्फ्रे पिंमेंटा यांनी म्हटले आहे.

'सणांच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याच्या उत्साहाला आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र, सार्वजनिक जागांचा वापर करताना नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांनी लावलेल्या फलकांसाठी लागू असलेल्या परवानगीच्या अटींची तपासणी करावी,' असे ते म्हणाले.