मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
राजकारणमहाराष्ट्र

२३३ कोटींचा मालमत्ता कर कंपन्यांनी थकवला; महापालिकेची वसुली दहा वर्षांपासून अपयशी

मुंबई महापालिकेला होर्डिंग आणि मोबाईल टॉवर कंपन्यांकडून २३३ कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करता आलेला नाही. मोबाईल टॉवर कंपन्यांकडे १५० कोटी ३८ लाख, तर जाहिरात कंपन्यांकडे ८२ कोटी ९० लाख थकीत आहेत. दहा ते पंधरा वर्षांपासून नोटिसा दिल्या तरी भरणा झालेला नाही.

· · १ मिनिटाचे वाचन

मुंबई : मुंबई महापालिकेला होर्डिंग आणि मोबाईल टॉवर कंपन्यांकडून २३३ कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करता आलेला नाही. या कंपन्यांनी दहा ते पंधरा वर्षांपासून हा कर थकवला आहे.

मोबाईल टॉवर कंपन्यांकडे १५० कोटी ३८ लाख २७ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे आणि दंडाची रक्कमही भरलेली नाही. जाहिरात कंपन्यांकडे ८२ कोटी ९० लाख रुपयांचा कर थकीत असून दंडही भरलेला नाही.

सामान्य मुंबईकरांकडून कर वसुलीसाठी प्रसंगी कठोर होणाऱ्या महापालिकेला या मोठ्या कंपन्यांकडून वसुली करताना मात्र यश आलेले नाही. वारंवार पत्रव्यवहार, मागणीपत्रे आणि नोटिसा पाठवूनही कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. तरी शेकडो कोटींची रक्कम वर्षानुवर्षे थकीत राहिल्याने वसुली यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबईत पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग, प्रमुख रस्ते, इमारती आणि खासगी जागांवर १,६०० हून अधिक लहान-मोठे होर्डिंग उभारले आहेत. यात साध्या होर्डिंगबरोबर डिजिटल जाहिरात फलकांचाही समावेश आहे.

या फलकांसाठी जागेचा व्यावसायिक वापर करून कंपन्या मोठा महसूल कमावत असताना महापालिकेच्या तिजोरीत कराची रक्कम मात्र जमा होत नसल्याचे चित्र आहे.

होर्डिंगची सर्वाधिक संख्या के पश्चिम विभागात (अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले पश्चिम) तसेच एच पश्चिम विभागात (वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम) असल्याचे सांगण्यात येते.

मोबाईल टॉवर कंपन्यांनी मुंबईतील खासगी इमारती, झोपडपट्ट्या, उड्डाणपूल आणि अन्य ठिकाणी टॉवर उभारले आहेत. या टॉवरसाठी लागणाऱ्या महापालिकेच्या परवानग्या आणि करभरण्याच्या बाबतीत उदासीनता दिसून येते.

२०२४ मध्ये भांडुपमधील झोपडपट्टी परिसरात मोबाईल टॉवर कोसळून अनेक झोपड्यांचे नुकसान झाले होते. संबंधित टॉवर विनापरवानगी उभारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

महापालिकेच्या नियमानुसार मालमत्ता कराचे देयक मिळाल्यानंतर ९० दिवसांत कर भरणे बंधनकारक आहे. मुदतीत कर न भरल्यास मागणीपत्र आणि त्यानंतर २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. दहा ते पंधरा वर्षे कर थकवणाऱ्या कंपन्यांनाही या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.