रायपूर : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील गुन्ह्याची रक्कम किती वाढली आहे, याचा आकडा समोर आला आहे. 2023 मध्ये सुमारे 11 हजार कोटी रुपये असलेली ही रक्कम आता 92 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात सांगितले.
ईडीने ही माहिती प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत रायपूर येथील विशेष न्यायालयात मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरची कोठडी मागताना दिली.
महादेव ऑनलाइन बुकिंग ॲपसाठी ही रक्कम 75 हजार ते 80 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्याच्या स्कायएक्स्चेंज डॉट कॉम या बहिणी संकेतस्थळासाठी 11 हजार ते 12 हजार कोटी रुपये आणि लोटस365 डॉट कॉमसाठी 2,400 कोटी रुपयांचा अंदाज आहे.
20 ऑक्टोबर 2023 रोजी ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केल्यानंतरही ही रक्कम एवढ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत ईडीने 100 हून अधिक आरोपींविरुद्ध पाच पूरक आरोपपत्रे दाखल केली आहेत. देशात व परदेशात मिळून 9,000 कोटी रुपये किमतीची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.
शुक्रवारी ईडीने चंद्राकरला रायपूर येथील पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले आणि सात दिवसांची कोठडी मागितली. त्याचे वकील तुषार गिरी यांनी सांगितले की एजन्सीने सात दिवसांची रिमांड मागितली आणि आम्ही ती मान्य केली.
"आम्हाला एजन्सीशी पूर्ण सहकार्य करायचे आहे आणि सत्य समोर यायला हवे," असे गिरी म्हणाले.
या महिन्याच्या सुरुवातीला सीबीआयने चंद्राकरला ओमानमधून प्रत्यर्पित केले होते. कोठडी मागताना सीबीआयने न्यायालयाला सांगितले होते की सिंडिकेटकडून लाच घेऊन कारवाई करू न देणाऱ्या पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांची ओळख पटवायची आहे. आठ दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
या प्रकरणात देशात व परदेशात मिळून आतापर्यंत 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त झाली आहे. तपास यंत्रणांच्या मते, हवाला आणि म्युल खात्यांमार्फत पैसा परदेशात नेला जात होता.