नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर), परिसीमन आणि महिला आरक्षणाबाबतची विरोधकांची चिंता मांडणार आहेत. “मी पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या पत्र लिहिले आहे; त्यांच्याकडे माझी दोन पत्रे आहेत,” असे खरगे यांनी सांगितले.
“मी उद्या त्यांना सर्व काही समजावून सांगेन. त्यात मतदार याद्यांच्या एसआयआरमुळे होणारे नुकसान, त्यांच्या परिसीमन प्रक्रियेचे परिणाम आणि महिला आरक्षणाचा मुद्दा यांचा समावेश आहे. महिला आरक्षण का लागू करत नाहीत?” असे खरगे म्हणाले.
याआधी सोमवारी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी परिसीमन विधेयकाबाबत सर्वपक्षीय बैठकीच्या खरगे यांच्या मागणीला उत्तर दिले. मार्च व एप्रिलमध्ये लेखी संवादातून आणि खरगे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चेतून सरकारने काँग्रेसचे सहकार्य मागितल्याचे रिजिजू म्हणाले. काँग्रेसने वारंवार विनंती करूनही चर्चेच्या तारखा दिल्या नाहीत, त्यामुळे सरकारने द्रमुक, समाजवादी पक्ष, वायएसआर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), एआयएमआयएम व बिजू जनता दल यांसारख्या इतर पक्षांशी चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.
मोदींनीही दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय पक्षांना साद घालत सर्वांनी राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. सरकार महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकासाठी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर 64 दिवस उलटले तरी अधिवेशनाची स्थगिती जाहीर केली नाही, अशी चिंता खरगे यांनी पत्रात मांडली आहे.
महिला आरक्षण व परिसीमन हे मुद्दे सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. केंद्र सरकार महिला आरक्षण विधेयक व परिसीमनासंबंधी संविधानदुरुस्ती विधेयकासाठी सर्वपक्षीय एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष जागा वाढवण्यास विरोध करत असून महिला आरक्षण सध्याच्या जागांमधूनच देण्याची मागणी करत आहेत. दक्षिणेकडील राज्यांना जागा वाढवल्यास आपले प्रतिनिधित्व घटेल, अशी भीती वाटते. बुधवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.