छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत आपल्यावरील ५०० कोटी रुपयांच्या आरोपांचे उत्तर एका ऑडिओ क्लिपने दिले. भाजपच्या वर्तुळातील हे कथित अंतर्गत संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना तपास यंत्रणांकडे पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. ते आव्हान स्वीकारत जरांगे म्हणाले की ते कोणाच्याही सांगण्यावरून बोलत नाहीत. “शिंदे साहेबांनी पुरावे मागितले होते. आज मी माध्यमांच्या साक्षीने ते जाहीर करत आहे,” असे ते म्हणाले.
जरांगे यांच्या दाव्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नेते पुढे करून त्यांचा प्रभाव कमी करण्याची आणि त्यासाठी वैयक्तिक पातळीवर निधी उभारण्याची चर्चा या क्लिपमध्ये आहे. “गेल्या तीन वर्षांपासून माझ्याविरुद्ध आणि मराठा आरक्षण आंदोलनाविरुद्ध नियोजनबद्ध षड्यंत्र रचले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
आपण भाजपकडून पैसे घेतले नाहीत, ना कोणाला दिले, असे सांगत जरांगेंनी ५०० कोटींचा अपप्रचार बदनामीचा डाव असल्याचा दावा केला. “मी कुणाचा राजकीय प्लॅटफॉर्म बनत नाही. मी मराठा समाजासाठी बोलतो,” असे ते म्हणाले.
शिंदे गटातील नेत्यांवर पलटवार करत जरांगे म्हणाले की ज्येष्ठ नेत्यांनी विषय समजून घ्यायला हवा होता. “बुद्धीवर परिणाम झाल्यासारखं बोलू नये,” असा टोला त्यांनी लगावला. या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जरांगेंची बाजू घेतली. “एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान लॉरेन्स बिष्णोईच्या पायावर गहाण ठेवला आहे,” असा टोला राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना लगावला. जरांगे हे महाराष्ट्राचे सुपुत्र असून त्यांनी भ्रष्टाचाराचे मुखवटे फाडल्यास जनता त्यांचे आभार मानेल, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे आणि शिंदे दोघांचीही नार्को टेस्ट आणि ईडी चौकशीची मागणी केली. “५०० कोटींचे व्यवहार झाले असतील तर दोघांची संपत्ती तपासली जावी,” असे ते म्हणाले. या आरोपांवर सत्ताधारी नेते काय स्पष्टीकरण देतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.