मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
जागतिक

संवेदनशील तंत्रज्ञान दहशतवाद्यांपर्यंत पोहोचू नये: भारताचे संयुक्त राष्ट्रांना आवाहन

मानवसंहारक अस्त्रांशी संबंधित संवेदनशील तंत्रज्ञान दहशतवाद वा अण्वस्त्र प्रसाराशी संबंध असलेल्यांकडे जाऊ नये, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सतर्क राहावे, असे भारताने आवाहन केले.

· · १ मिनिटाचे वाचन

संयुक्त राष्ट्रे : मानवसंहारक अस्त्रे म्हणजेच वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनशी संबंधित संवेदनशील तंत्रज्ञान दहशतवाद वा अण्वस्त्र प्रसाराशी संबंध असलेल्यांच्या हाती लागू नये, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सतर्क राहावे, असे आवाहन भारताने केले. याद्वारे भारताने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश केल्याचे मानले जात आहे.

निशस्त्रीकरण व आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठीच्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या प्रथम समितीसमोर खासदार अलोक कुमार सुमन यांनी सोमवारी भारताची भूमिका मांडली. 'आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे सर्वात मोठे आवाहन आहे. त्यामुळे असे संवेदनशील तंत्रज्ञान दहशतवादाशी संबंधितांकडे जाऊ नये, यावर अंकुश ठेवायला हवा,' असे ते म्हणाले.

पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख ए. क्यू. खान यांनी अण्वस्त्र तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी पुढाकार घेतला होता. अमेरिकेने त्यांचा उल्लेख अण्वस्त्र तंत्रज्ञानाचे 'वन स्टॉप शॉपिंग' असा केला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने ही भूमिका मांडल्याचे सांगितले जाते.

भारत २००२ पासून ही भूमिका मांडत असून याबाबत ठरावही मांडला होता, याकडे सुमन यांनी लक्ष वेधले.