मुंबई : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मंगळवारी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे व पत्नी जिनेट डी. रुबियो यांचे येथे स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वही मुख्यमंत्र्यांनी रुबियो यांना सांगितले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते.
यानंतर रुबियो यांनी ताज महाल पॅलेस हॉटेल येथे दहशतवादाच्या हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. त्याच ठिकाणी त्यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली.
रुबियो यांच्या या भारत दौऱ्यादरम्यान जयशंकर यांच्यासह भारत-अमेरिका-अमिराती त्रिपक्षीय बैठकही झाली. त्यात ऊर्जा, संपर्कव्यवस्था आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा झाली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील स्वागताने दौऱ्याला स्थानिक रंग दिला.