मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रमहाराष्ट्र

धनंजय मुंडेंचा इशारा : 'आता वाऱ्याची दिशा बदलतीये'

बीड जिल्ह्यातील दोन दसरा मेळाव्यांतून वेगळे सूर उमटले. आमदार धनंजय मुंडे यांनी विरोधकांना वाऱ्याची दिशा बदलल्याचा इशारा दिला, तर आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना टोकाचा निर्णय न घेण्याचे आवाहन केले.

· · १ मिनिटाचे वाचन
धनंजय मुंडेंचा इशारा : 'आता वाऱ्याची दिशा बदलतीये'

बीड : बीड जिल्ह्यातील दोन दसरा मेळाव्यांतून मंगळवारी (२० ऑक्टोबर) वेगवेगळे सूर उमटले.

सावरगाव घाट येथील श्रीक्षेत्र भगवान भक्तीगडावर मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आमदार धनंजय मुंडे सलग दुसऱ्यांदा सहभागी झाले होते. भाषणासाठी उभे राहिल्यावर झालेल्या जोरदार घोषणाबाजीवर त्यांनी मिश्कील टिप्पणी केली आणि उपस्थितांत हशा पिकला.

गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणली, आपणही उसतोड कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, पण हे सर्व करूनही शेवटी टीकेचे धनी व्हावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'मागच्या दसरा मेळाव्यात बोललो आणि आता बोललो, बाकी कुठेही व्यक्त झालो नाही. पण आता फार सहन केले,' असे सांगत त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. शेरो-शायरीचा आधार घेत त्यांनी विरोधकांना सुनावले, 'तुम्ही कितीही बोला, पण मी बोलणार नाही. काही मैफली माझ्या तबाहीसाठी बसल्या आहेत, पण त्यांना अजून ठाऊक नाही की आता वाऱ्याची दिशा बदलत आहे.'

आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या मेळाव्यात आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. दुष्काळाचे गांभीर्य ओळखून आर्थिक नियोजन करा आणि भावनेच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका, असे ते म्हणाले.

'अडचणीत असाल तर एक फोन करा. तुमच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध आहे,' अशी ग्वाही धस यांनी दिली. पुढील काळात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने संयम राखा आणि कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने अनावश्यक खर्च टाळा, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळाचा फटका पशुधन आणि वन्यजीवांनाही बसतो, त्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न हवेत, असे धस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न होतील आणि संकटात कोणीही एकटे पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.