मुख्य सामग्री पर जाएं
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
महाराष्ट्रमहाराष्ट्र

पेसा क्षेत्रातील पदभरती प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा: आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश

यह लेख अभी हिंदी में उपलब्ध नहीं है; मराठी संस्करण दिखाया गया है।

राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदे विशेष मोहिमेद्वारे भरण्यासाठी तात्काळ आवश्यक पावले उचलावीत. पात्र अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही पदभरती प्रक्रिया नियमानुसार, पूर्णतः पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत.

लेखक: mukhymantri.com· · 2 मिनट में पढ़ें
Minister Ashok Uike PESA recruitment meeting Mantralaya
फ़ोटो: Team DGIPR

मंत्रालयातील समिती कक्षात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार राजू तोडसाम यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व घेतलेले निर्णय: रिक्त पदांचा जिल्हानिहाय आढावा:

बैठकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदभरती, रिक्त पदांची सद्यस्थिती, विविध नामावल्या, बिंदुनामावली (Roaster), सेवा प्रवेश नियम आणि भरती प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. मुख्य सचिवांनी सर्व रिक्त पदांची अद्ययावत माहिती तातडीने संकलित करून जिल्हानिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

विभागीय समन्वय व प्रलंबित बाबींचा निपटारा:

उपलब्ध पदे, आरक्षण स्थिती आणि भरती प्रक्रियेतील प्रलंबित मुद्द्यांवर जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासन स्तरावरील अडचणी संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून सोडवाव्यात, असे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.

'स्थानिक अनुसूचित जमाती' निकषावर स्पष्टता:

पदभरती दरम्यान 'स्थानिक अनुसूचित जमाती' या निकषामुळे काही भागांत उद्भवलेल्या समस्यांवर बैठकीत सखोल चर्चा झाली. शासन आदेश, घटनात्मक व कायदेशीर तरतुदी आणि न्यायालयाचे निकाल विचारात घेऊन संबंधित विभाग यावर स्पष्ट व सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना निश्चित करणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या सेवास्थितीचा प्रस्ताव:

पेसा कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी व नंतर नियुक्त झालेले कर्मचारी, तसेच प्रशासकीय अथवा जिल्हा बदलीने पेसा क्षेत्रात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवास्थितीबाबत स्पष्टता आणण्यासाठी अचूक माहिती गोळा करून योग्य प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला गती:

पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीच्या स्थितीचाही विशेष आढावा घेण्यात आला. पवित्र पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज, पात्र उमेदवारांची संख्या आणि जिल्हानिहाय शिक्षकांची गरज तपासून ज्या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, तेथे प्राधान्याने आवश्यक शिक्षक वर्ग उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.