Skip to content
MukhyamantriMukhyamantri
BREAKINGBusinessMaharashtra

राज्यातील महिला उद्योजकांसाठी आनंदाची बातमी: 'महिला स्टार्ट-अप हब'ची होणार स्थापना; महाराष्ट्र शासन आणि उदैती फाउंडेशन यांच्यात महत्त्वपूर्ण करार

This article is not available in English yet; showing the Marathi version.

· · 2 min read
CM Devendra Fadnvis

राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि नवउद्योजकतेला अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला-नेतृत्वाखालील स्टार्ट-अप्सना आर्थिक पाठबळ, हक्काची बाजारपेठ आणि योग्य व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात विशेष 'महिला स्टार्ट-अप हब' उभारण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी (MSInS) आणि उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी एक मजबूत परिसंस्था (Eco-system) उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

एकाच छताखाली मार्गदर्शन, वित्तपुरवठा आणि बाजारपेठ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या करारानुसार, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील आणि उदैती फाउंडेशनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

समन्वयाचे व्यासपीठ: हा हब विविध शासकीय विभाग, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि महिला उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम करेल.

ॲक्सिलरेटर मॉडेल: महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांसाठी विशेष 'ॲक्सिलरेटर मॉडेल' राबवले जाईल. याद्वारे स्टार्टअप्सना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार तांत्रिक सहाय्य, व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून दिला जाईल.

भांडवल व बाजारपेठ जोडणी: नवउद्योजक महिलांना सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या खेळत्या भांडवलाची व बाजारपेठेची उपलब्धता करून देण्यावर या प्रकल्पाचा मुख्य भर असेल.

प्रगती मोजण्यासाठी 'महिला स्टार्ट-अप निर्देशांक' आणि गव्हर्नन्स डॅशबोर्ड धोरणांची अंमलबजावणी केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष परिणामकारक ठरावी, यासाठी विशेष डेटा-आधारित यंत्रणा उभारली जाणार आहे:

महिला स्टार्ट-अप निर्देशांक (WEI Index): राज्यातील विविध जिल्हे आणि विभागांमध्ये महिला उद्योजकतेची प्रगती तपासण्यासाठी लिंग-विभागित (Gender-disaggregated) डेटाच्या आधारे विशेष निर्देशांक विकसित केला जाईल.

गव्हर्नन्स डॅशबोर्ड: सर्व जिल्ह्यांतील महिला स्टार्ट-अप्सच्या कामगिरीचे थेट निरीक्षण करण्यासाठी एक डिजिटल डॅशबोर्ड कार्यरत राहील, ज्यायोगे वस्तुस्थितीवर आधारित निर्णय घेणे प्रशासनाला सोपे जाईल.

आंतरविभागीय संचालन समिती: विविध शासकीय यंत्रणांमध्ये सुलभ समन्वय साधण्यासाठी आणि या निर्देशांकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

उदैती फाउंडेशनची भूमिका काय? उदैती फाउंडेशन भारतातील महिलांचा आर्थिक सहभाग वाढवण्यासाठी कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे. देशातील सुमारे १५६ दशलक्ष रोजगारक्षम महिलांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे, महिलांना केवळ नोकरी शोधणाऱ्या न ठेवता 'रोजगार देणाऱ्या' बनवणे, तसेच बालसंगोपन, निवास आणि सुरक्षित प्रवासासारख्या मूलभूत घटकांना डेटाच्या आधारे बळकट करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. या भागीदारीमुळे 'विकसित भारत २०४७' या राष्ट्रीय उद्दिष्टाला मोठी चालना मिळेल, असे फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी नमूद केले.