मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजराजकारणमहाराष्ट्र

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे रोहित पवारांना खुले आव्हान

पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आता तीव्र वैयक्तिक आणि राजकीय वळण लागले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार आणि आंदोलनकर्ते विवेकानंद पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बन यांनी या दोन्ही नेत्यांना भारतीय परंपरा, धर्मशास्त्र आणि संस्कृतीवरील आपले ज्ञान सिद्ध करण्याचे थेट आव्हान दिले आहे.

लेखक: mukhymantri.com· · २ मिनिटांचे वाचन
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे रोहित पवारांना खुले आव्हान

'पुस्तक उघडून तरी श्लोक म्हणून दाखवा' – नवनाथ बन

नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, "दोन्ही नेत्यांनी रामरक्षेचे किंवा भगवद्गीतेतील श्लोक म्हणून दाखवावेत, अथवा वारकरी संप्रदायातील एखादा अभंग त्याचा सविस्तर अर्थ लावून समजावून सांगावा. हे करताना त्यांना समोर पुस्तक उघडे ठेवण्याचीही मुभा आहे." इतकेच नव्हे तर, "जर या विषयांवर ५०० गुणांची परीक्षा घेतली, तर रोहित पवारांना साधे उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळवणेही कठीण जाईल," असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

आपल्यावर झालेल्या वैयक्तिक टिकेला उत्तर देताना बन यांनी नाथ आणि वारकरी परंपरेचा सविस्तर संदर्भ दिला. आदिनाथांपासून ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापर्यंत या परंपरा कशा विस्तारल्या, याचा आढावा घेत त्यांनी विरोधकांना सांस्कृतिक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला.

'आमचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक, पवारांचे...' कुटुंबावर थेट आरोप

आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख करताना नवनाथ बन यांनी पवार घराण्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. "मी इतर मागासवर्गीय (OBC) आणि भटक्या विमुक्त समाजातून आलो आहे. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी निजाम आणि रझाकारांविरुद्ध लढा दिला आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी स्वतःची जमीन-जुमला विकला. मात्र, पवारांच्या पूर्वजांनी भ्रष्टाचारातून आपली संपत्ती उभी केली," असा घणाघात त्यांनी केला.

वादाची नेमकी पार्श्वभूमी काय?

पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विवेकानंद पाटील यांनी नवनाथ बन यांच्यावर वैयक्तिक टीका करताना त्यांचा उल्लेख "कचराकुंडीतील बुद्धिमत्ता" असा केला होता. या बोचऱ्या टिकेनंतर भाजप आक्रमक झाली असून बन यांनी थेट सांस्कृतिक आणि वैयक्तिक मुद्द्यांवरून पलटवार केला आहे.

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात सुरू आहे. पेपरफुटीची प्रकरणे आणि परीक्षांमधील गोंधळ या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी हे आंदोलक करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या या संघर्षात आता धर्मशास्त्र, संतांचे अभंग आणि कौटुंबिक आरोप-प्रत्यारोपांची भर पडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवनाथ बन यांच्या या खुल्या आव्हानाला आता आमदार रोहित पवार आणि विवेकानंद पाटील काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.