भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरेचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची पावन भूमी सज्ज होत आहे. जगभरातून गोदातीरावर आणि त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुकर, सुरक्षित आणि भक्तिमय व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात विकासाचा महायज्ञ सुरू आहे. या विकासकामांमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा संपूर्णपणे बदलणार असून, पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून सुरू असलेली ही सर्व कामे उच्च दर्जासह निर्धारित वेळेत पूर्ण होतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून त्र्यंबकेश्वर येथील पवित्र गोदाघाट, भाविकांसाठी तयार होणारा दर्शनपथ, नाशिकमधील वाहतुकीचा मुख्य कणा मानले जाणारे द्वारका सर्कल तसेच ओझर विमानतळावरील विकासकामांची सविस्तर पाहणी केली.
पुढील २५ ते ३० वर्षांसाठी सनातन परंपरेचा भक्कम विकासाचा पाया पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांच्या गुणवत्तेचा आणि प्रगतीचा सूक्ष्म आढावा घेत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले:
"सिंहस्थ महाकुंभमेळा हा केवळ एक शासकीय उपक्रम नाही, तर आपल्या अध्यात्म, संस्कृती आणि भाविकांच्या श्रद्धेचा महान उत्सव आहे. त्यामुळे इथे सुरू असलेली कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून, आगामी २५ ते ३० वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया रचणारी आहेत. भाविक, साधू-संत आणि पर्यटकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक नगररचना साकारली जात आहे."
त्र्यंबकराजाच्या दरबारी भाविकांसाठी भव्य दर्शनपथ आणि गोदाघाट द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, दर्शनपथ आणि गोदाघाट परिसरातील कामे अत्यंत नियोजनबद्धरीत्या मार्गी लावली जात आहेत. भौगोलिक आव्हाने असूनही मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. लाखो वारकरी, भाविक आणि शिवभक्तांना कोणत्याही अडथळ्याविना सहज दर्शन घेता यावे आणि तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपले जावे, यासाठी ही व्यवस्था जागतिक दर्जाची केली जात आहे.
द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळ: वाहतुकीला नवी दिशा नाशिक शहराच्या वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कलच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी जातीने पाहणी केली. अत्यंत क्लिष्ट असलेले हे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू असून, यंदा पावसाळ्यात पाण्याची चाचणी यशस्वी ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात भविष्यात जलमय स्थिती होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
तसेच, हवाई मार्गाने येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भाविकांच्या सुविधेसाठी ओझर विमानतळाच्या धावपट्टी व टर्मिनस विस्तारीकरणाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. आगामी टप्प्यात विमान वाहतुकीशी संबंधित पायाभूत सुविधांना आणखी गती दिली जाईल, असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व यंत्रणांचे सक्षम नेतृत्व: कौतुकाची थाप देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा, पोलीस दल आणि लोकप्रतिनिधींमध्ये घडवून आणलेल्या उत्कृष्ट समन्वयाचे दृश्य या पाहणी दौऱ्यात ठळकपणे दिसून आले. महानगरपालिका, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, एमएसआरडीसी आणि जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले.
