हेच पुन्हा पुन्हा म्हणेल -
या अशा वेळी अजूनही कुणी राजकीय, धार्मिक, जातीय, सब-जातीय, प्रादेशिक किंवा इतर स्कोअर सेटल करण्याच्या नादात असेल, तर आपल्याला अजूनही गांभीर्य कळाले नाही असंच म्हणावं लागेल. माणूस म्ह्णून आपलं पाहिलं काम आहे ते माणसाचं इथं पृथ्वीवर टिकनं. त्यानंतर बाकी सगळं त्या अस्तित्वावरचं डेकोरेशन. आता नुसतंच डेकोरेशन ला घेऊन बसायचं की मुळावर लक्ष द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही! कारण तो ऑप्शनच नाही आपल्याला. तुमचं स्वातंत्र्य तुमच्या नाकाच्या 1 इंच कक्षे पर्यंत. फार फार तर ढेरी मुळे वाढलेली कक्षा विचारात घेतली जाऊ शकते. पण तुमच्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेच. त्यापुढची सगळी टेरेटरी सामूहिक असते.
वेद, कुराण, बायबल अजून दुसरं काय असेल ते या सगळ्यांच्या आधी इथं अस्तित्वात माणूस होता आणि आहे. माणूस मूळ आहे. बाकी सगळं डेकोरेशन. म्ह्णून वेदांचे पंडित व्हा, पोप व्हा किंवा मग साम्यवादाचे ज्ञाते. माणूस, त्याचं सुख-दुःख आणि जगणं याबद्दल तुम्हाला संवेदना नसेल तर मग तुम्ही शिकलेली विद्याच मुळात चूक आहे किंवा मग तुम्ही ती चूक आत्मसात केलीयं.
तुम्ही कसली तरी क्रांती करण्याच्या उद्देशाने कुठल्याशा विचारधारेचा भाग होता. बहुतांशवेळी तुम्ही तिचा भाग होत नसता, भक्त होता. ती विचारधारा उजवी, डावी, मधली, उभी किंवा आडवी कशीही असली तरी असंच कांहीसं होतं. बहुतेकांच्या बाबतीत. त्यासोबतच ती विचारधारा तोंडी लावण्याच्या पलीकडे अनेकांना माहीतही नसते. आपण कशाचा तरी भाग आहोत या गोष्टीतच आपलं समाधान झाल्याने आपण तोंडी लावण्यापालिकडे ती विचारधारा समजून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मग आपल्याला फक्त दिसतात दुसऱ्या विचारधारेचे अनुयायी. बस्स मग काय. आपण बोलून चालून भक्त. आपल्या विचारधारेची निष्ठा सिद्ध करायला आपण त्यांच्यावर हल्ले करणे हा सगळ्यात सोपा उपाय. मग आपण तेच करतो. हल्ले. तेही तेच करतात. हल्ले. मग त्यांचे लोक त्यांचा सत्कार. आपले लोक आपला सत्कार. सगळ्यांनाच आपण कशाचा तरी भाग असल्याचा आनंद साजरा करण्याची ही ती संधी! लढणारे आणि सत्कार करणारे सगळेच विचारधारा फक्त तोंडी लावणारे असतात. बहुतांश.
म्ह्णून त्यांच्या जास्त नादी लागू नये. मुळात कुणाच्याच जास्त नादी लागू नये!
वेळ नव्हता म्ह्णून न लिहलेल्यातून!
No comments:
Post a Comment