शिवजयंती - 19 फेब्रुवारी 2016
कशास हवा तुम्हा सिकंदर
कशास हवा कोलंबस
शिव छत्रपतीला स्मरा एकदा
मग तुम्हीच हो सिकंदर
अन् तुम्हीच हो कोलंबस, तुम्हीच हो कोलंबस!
सुर्य स्वयंप्रकाशित असतो. त्याच्या प्रकाशाच्या किरणांची कमाल ही कि सानिध्यात येणारा चंद्रही प्रकाशमान होवून पृथ्वीवरचा रात्रीचा अंधकार दूर करतो. असचं जिवन आपल्या शिव छत्रपतींचं. शिव चरित्राचा स्पर्श झालेली असंख्य आयुष्यं उजळून निघाली आहेत आणि शिव विचारांचा प्रकाश घेऊन सामान्य जनांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी ती आहोरात्र झटतायेत.
आजही शेतकऱ्यांसाठी काम करतांना आपल्याला छत्रपती शिवाजींचे "शेतकऱ्यास काडीचेही नुकसान न होऊ देणे" हे वचन प्रमाण आहे. जाती निर्मुलनाच्या लढ्यात आजही अठरापगड जाती महाराजांच्या काळी एकदिलाने लढायच्या याचा आदर्श आहे. धर्माच्या भिंतींनी विभागलेला इथला हिंदू आणि मुस्लिम समाज आजही "छत्रपती शिवाजी महाराज की… " म्हंटल कि हृदयाच्या खोलपासून "जय्य्य !!" म्हणतो. अशा या सामन्यांच्या राजाची आज जयंती.
समाजात दुष्काळाने काही अंशी आलेली मरगळ आणि सामाजिक ऐक्यावर पडलेले छोटे छोटे तडे; या साऱ्यातून बाहेर पडावं म्हणून शिवजयंतीच्या निमित्याने आपण सर्व तरुणांनी आज संकल्प करावा.
हिरमुसलेले शेतकरी आज शिवराय असते तर या परीस्थित नसते. पण, आजही शासन व्यवस्थेने शेतकऱ्याला हृदयाला लावावे म्हणून आवाज उठवणे आपल्याच हातात आहे. या वेळी अखंड समाज जातीभेद व क्षेत्रीयभेद विसरून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला याचं करावं तितक कौतुक कमी आहे. शहर आणि खेडी यांच्यातले आर्थिक अंतर वाढले असले तरी, माणसांच्या मनातली अंतरं अजूनही कमीच आहेत, याची प्रचीती आली. तसंच शासन व्यास्थेनेही करावं म्हणून आपण सगळ्यांनी मिळून तगादा लावायला हवा. शासनही माणसचं चालवता असतात, फक्त सत्तेच्या गोंगाटाने व्यवस्थेच्या कानाचे पडदे बधिर झालेले असतात. पण, योग्य आवाजात बोललं की ते ही ऐकतात. म्हणून ज्यांना बोलता येते त्यांनी बोलणे म्हत्वाचे.
समाज प्रगल्भ आणि विकसित होत असतांना त्याला अनेक परीक्षांतून जावे लागते. या अशा परीक्षांमधेच समाजाच्या मोठं होण्याच्या तयारीचा अभ्यास असतो. आज काही अंशी जातीय अहं आणि द्वेष वाढीला लागल्यासारखे वाटत आहे. बहुसंख्य समाज, विशेषतः तरुण, जातीपतीची बंधनं आणि ओझी झुगारून पुढे जात आहे. पण दुसरीकडे राजकीय स्वार्थासाठी आणि जातीय गंडासाठी याच तरुणांना पुन्हा त्या जुन्या 'ब' ब्राम्हणाचा, 'म' मराठ्याचा, 'ध' धनगरांचा, 'मा' माळ्यांचा, 'र' महारांचा, बाराखड्या शिकवल्या जात आहेत. मान्य, तरुण याला बळी पडणार नाहीत. तरीही हा विषारी प्रचार तरुणांना उलट्या दिशेने प्रवास करायला लाऊ शकतो याची भीती आपण सगळ्यांनीच बाळगून रहायला हवी. सगळे जाती-धर्म खांद्याला खांदे लाऊन लढले म्हणूनच स्वराज्य उभे राहू शकले. आजही या देशाच्या झालेल्या प्रगतीला इथली संविधानाने घालून दिलेली समानतेची व्यवस्थाच कारणीभूत आहे. नसता, मोजक्या लोकांच्या हिमतीवर हा देश इथवर, म्हणजे आज तुमच्या हातात मोबाईल किंवा कॉम्पुटर आहे तिथवर, येऊ शकला नसता.
म्हणूनच या छोट्या मोठ्या दुभंगांना न जुमानता एकसंध समाज निर्मितीसाठी जमेल तिथे, जमतील तसे, आपण सगळे प्रयत्न करूयात. शिवरायांना जयंतीदिनी हीच खरी वंदना होईल.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जिजाऊ.कॉम कडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
जय जिजाऊ. जय शिवराय.
आपलेच कार्यकर्ते
अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे
जिजाऊ.कॉम