भारतीय राज्यघटनेच्या जडणघडणीवर आधारित ‘संविधान : द मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिटय़ुशन’ ही टीव्ही मालिका दोन मार्चपासून दर रविवारी सकाळी १० वाजता ‘राज्यसभा’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे. ‘यात्रा’ आणि ‘भारत एक खोज’ या टीव्ही मालिकांनंतर प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांची ही तिसरी मालिका. या मालिकेतून त्यांनी भारतीय राज्यघटनेचा इतिहासच कथन केला आहे.

..आपण विरोधाभासाच्या जीवनात प्रवेश करतो आहोत. राजकीय बाबतीत आपण समानता स्वीकारणार आहोत, तर सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपण असमानता आचरणार आहोत. म्हणजे राजकारणात ‘एक व्यक्ती, एक मत’ आणि ‘एक मत आणि एक किंमत’ असं आपलं धोरण असेल तर सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपण ‘एक व्यक्ती आणि एक किंमत’ हे तत्त्व स्वीकारणार नाही..
खणखणीत आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसदेच्या सेंट्रल सभागृहात भाषण करत असतात. सगळी संसद त्यांचं भाषण मंत्रमुग्ध होऊन एकत असते. त्यांच्यात पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सी. राजगोपालचारी, गोविंद वल्लभ पंत, आचार्य कृपलानी असे अनेक नेते असतात. डॉ. आंबेडकर अत्यंत आवेशपूर्ण पद्धतीने भारतीय राज्यघटनेचं वैशिष्टय़ सांगतात, तेव्हा सगळे सदस्य स्तंभित होऊन त्यांच्याकडे पाहत असतात.
हे दृश्य आहे ‘संविधान : द मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिटय़ुशन’ या टीव्ही मालिकेतील. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका राज्यसभा वाहिनीवर दोन मार्चपासून सादर होत आहे. भारतीय राज्यघटनेची जडणघडण कशी झाली, हा विषय असलेली ही मालिका म्हणजे राज्यघटनेवर आधारित भारतीय पडद्यावर आलेली आजवरची पहिलीच कलाकृती आहे. भारताची राज्यघटना तयार झाली तेव्हा नेमकं काय काय घडलं, कोणा कोणाचा यात सहभाग होता, घटना तयार करायला किती कालावधी लागला यांसारख्या अनेक गोष्टींचा तपशीलवार खुलासा या दहा भागांच्या मालिकेतून होणार आहे. एक प्रकारे या मालिकेतून भारतीय घटनेचा दृक-श्राव्य दस्तावेजच भारतीय प्रेक्षकांसमोर उभा राहणार आहे.

‘या मालिकेची मूळ कल्पना भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे चेअरमनही असतात. राज्यसभा चॅनेलसाठी आपल्या राज्यघटनेवर आधारित एखादा कार्यक्रम तयार करण्यात यावा, अशी त्यांची इच्छा होती. राज्यसभेच्या समितीतही हा विचार मांडण्यात आला तेव्हा सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली. या समितीत सगळ्या पक्षांचे राज्यसभा सदस्य असतात आणि ती राज्यसभा वाहिनीवर कुठले कार्यक्रम असावेत, यासंबंधी सल्ला देण्याचं काम करते. हमीद यांनी ही कल्पना मांडली तेव्हा मीही राज्यसभेचा सदस्य होतो. त्या वेळी मी ही मालिका तयार करू शकलो नाही. कारण मी स्वत:च राज्यसभेचा सदस्य असल्याने मला तेव्हा ती करता येणं शक्य नव्हतं. परंतु माझा राज्यसभेतील कार्यकाल संपल्यावर एक स्वतंत्र निर्माता म्हणून मी ही मालिका करायला तयार झालो,’ श्याम बेनेगल या मालिकेची कल्पना कशी पुढे आली ते सांगतात.
या मालिकेचा काळ आहे तो डिसेंबर १९४६ ते नोव्हेंबर १९४९ असा साधारणपणे तीनेक वर्षाचा. दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार १९४५ मध्ये महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटिश सरकारची दोन शिष्टमंडळं भारतात आली. त्यातलं एक कॅबिनेट मिशन होतं आणि त्यांच्या भारतभेटीनंतर भारतीय स्वातंत्र्याचा पाया रचला गेला. १९४७ मध्ये आपल्याला ख-या अर्थाने स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला, परंतु आपल्या प्रजासत्ताक देश व्हायचा असल्याने आपल्याला स्वतंत्र घटना तयार करण्याची आवश्यकता होती. या घटनेच्या निर्मितीसाठी बैठका स्वातंत्र्याच्या आधीपासून होत होत्या.
श्याम बेनेगल सांगतात, ‘साधारणपणे तीन र्वष या बैठका होत होत्या. या बैठकांत अनेक विषयांवर चर्चा, वादविवाद, युक्तिवाद होत होते. उदा. आपल्या देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी, सरकारी नोकरीत राखीव जागा असाव्यात की नाही, नागरिकांना मूलभूत अधिकार कोणते असावेत, त्याची मार्गदर्शक तत्त्वं काय असावीत वगैरे वगैरे. आपल्या देशाने लोकशाही प्रजासत्ताक बनायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आपल्याला घटनादेखील अशी हवी होती की, जिच्यात या लोकशाही प्रजासत्ताकाचं प्रतिबिंब असेल. यासंदर्भातले वादविवाद, युक्तिवाद, सादरीकरण याच्यावरच ही दहा तासांची मालिका आधारित आहे.’

१९४६ ते १९४९ या काळात आपल्या देशातली परिस्थिती कशी होती, स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांची विचारधारा कशी होती, हे दाखवण्यासाठी बेनेगल यांच्या टीमला बरंच संशोधन करावं लागलं. खूप संदर्भ गोळा करावे लागले. भारताची घटना तयार करण्यात अनेक नेत्यांचा सहभाग होता. उदा. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य कृपलानी, श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे. वेगवेगळे विचारप्रवाह असलेल्या या नेत्यांच्या लकबी काय होत्या, ते कसे दिसत, याबरोबरच त्यावेळी बाहेर लोकांमध्ये काय वातावरण होतं, याचाही अभ्यास या मालिकेसाठी करणं महत्त्वाचं होतं.
‘भारतीय राज्यघटनेची जडणघडण होत होती, त्या वेळी तीन महत्त्वाच्या घटना भारतीय उपखंडात घडत होत्या. भारताची फाळणी, महात्मा गांधी यांची हत्या आणि पाकिस्तानात मोहंमद अली जीना यांचे निधन. या घटनांमुळे तो काळ ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे भारताचा नकाशा पूर्णपणे बदलून गेला आणि भारतीय लोकजीवनही पूर्णपणे ढवळून निघालं होतं. याच काळात देशाची घटना कशी असावी, यावर वादविवाद आणि युक्तिवाद होत होते. हे सगळं होऊन ती आकाराला आली आणि तिला मान्यताही मिळाली. ही सगळी कहाणी किती नाटय़मय होती, हे फारसं कुणाला ठाऊक नाही. विशेषत: आजच्या तरुण पिढीला घटनेबद्दल काहीच माहीत नाही. घटना बनवण्यात अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांचा कसा महत्त्वाचा वाटा होता, याचीही आजच्या पिढीला कल्पना नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी म्हणजे शालेय किंवा कॉलेज विद्यार्थीच नव्हे तर मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावणा-या प्रौढांनीही आपली राज्यघटना म्हणजे नेमकं काय, हे जाणून घ्यायला हवं. म्हणूनच या टीव्ही मालिकेची संकल्पना पुढे आली. हे एक आव्हान होतं आणि ते आम्ही आमच्या परीने पेललं आहे,’ असं बेनेगल सांगतात तेव्हा या मालिकेचा नेमका उद्देश कळतो.
या मालिकेचं लेखन अतुल तिवारी (त्यांनी या मालिकेत गोविंद वल्लभ पंत यांची भूमिकाही केली आहे.) आणि शमा झैदी यांनी केलं असलं तरी या मालिकेतील बरेचसे संवाद म्हणजे भाषणंच आहेत आणि ती त्या वेळी वेगवेगळ्या नेत्यांनी असेंब्लीत किंवा बैठकांमधून केलेली मूळ भाषणंच आहेत. ही भाषणं इतिवृत्त स्वरूपात आजही उपलब्ध आहेत, तसंच असेंब्लीतील भाषणांचं ऑडिओ रेकॉर्डिगही झालेलं आहे. संसदेच्या ग्रंथालयात आजही ही भाषणं उपलब्ध आहेत. हा ऑडिओ संदर्भ जसाच्या तसा वापरण्यात आला आल्याने घटनानिर्मितीच्या वेळी नेमकं काय घडलं याचा अंदाज येईल.

या मालिकेत एकूण तीनशे कलाकार आहेत. त्यातल्या दीडेकशे कलाकारांच्या तोंडी संवाद आहेत, तर उर्वरित संसद सदस्य या भूमिकेत आहेत. यातले बरेचसे रंगभूमीवरील कलाकार आहेत. उदा. राजेंद्र गुप्ता हे डॉ. राजेंद्र प्रसाद बनलेत, टॉम अल्टर मौलाना अब्दुल कलामांची भूमिका करताहेत, नरेंद्र झा जीना साकारताहेत, सचिन खेडेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा करताहेत, दलीप ताहील पंडित नेहरू झालेत, नीरज नबी महात्मा गांधींच्या भूमिकेत आहेत. कलाकारांची ही निवड कशी केली, हे सांगताना बेनेगल म्हणाले, ‘यातल्या ब-याचशा कलाकारांबरोबर मी पूर्वीही काम केलेलं आहे. ‘भारत एक खोज’ या मालिकेत मी पाचेकशे कालाकारांना घेऊन काम केलं होतं. त्यातले बरेचसे मी या मालिकेतही घेतले आहेत, पण काही नवे चेहरेही घेतलेत. कारण ते जी व्यक्तिरेखा साकारणार आहेत, तिच्या जवळ जाणारं कलाकाराचं व्यक्तिमत्त्व असावं, ही काळजी मला घ्यावी लागली. सचिन खेडेकरला मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वाची भूमिका दिली. आंबेडकर हे ख-या अर्थाने भारतीय घटनेचे शिल्पकार होते. सचिन खेडेकरला ही भूमिका देताना मला वाटलं की, त्याला मला डॉ. आंबेडकरांसारखं दाखवता येईल. दुसरं कारण असं की, आंबेडकर हे मराठी होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याची सचिनच्या बोलण्याची लकब (अॅक्सेंट) जुळणारी होती. आंबेडकर संसदेत केवळ इंग्रजी भाषेत बोलत, पण त्यात काहीशी महाराष्ट्रीय ढब असे. सचिनने त्यांची भूमिका केल्याने तो इंग्रजी बोलतो, तेव्हाही त्याच्या इंग्रजीला विशिष्ट अशी मराठी ढब असते. अर्थात, आम्हाला प्रत्येक व्यक्तिरेखेचा बारीक विचार करून, त्यांच्याविषयीचे बारीकसारीक तपशील गोळा करून कलाकारांची निवड करावी लागली.’
या मालिकेचं बरंचसं शूटिंग मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीत झालं आहे. यासाठी इथे संसदेच्या सेंट्रल हॉलचा खास सेट उभारण्यात आला होता. मालिकेचं थोडंफार शूटिंग संसद परिसरातही झालं. ‘सूत्रसंचालकाचा भाग आम्ही तिथे चित्रित केला, तर कलाकारांना घेऊन केलेलं संसदेच्या अधिवेशनाचं शूटिंग आम्ही चित्रनगरीत केलं. कारण या मालिकेत कलाकारांचा ताफा खूप मोठा असल्याने एवढय़ा मोठय़ा संख्येने कलाकार घेऊन संसदेत शूटिंग करणं शक्य नव्हतं. तो देशातील सर्वाधिक सुरक्षाव्यवस्था असलेला परिसर आहे. त्यामुळे संसदेचा हुबेहुब सेंट्रल हॉल आम्ही चित्रनगरीत उभा केला,’ बेनेगल शूटिंगविषयी माहिती देतात. विक्रम गायकवाड यांनी या मालिकेत व्यक्तिरेखांचा इतका सुरेख मेकअप केलाय की, कलाकार हुबेहुब वाटतात. तीच कमाल कपडेपट सांभाळणा-या पिया बेनेगल यांनीही केली आहे. या दोघांच्या कामगिरीमुळे त्या वेळचा काळ जिवंत झाल्यासारखा वाटतो.
बेनेगल सांगतात, ‘भारताच्याच नव्हे तर जगातील कुठल्याही देशाच्या राज्यघटनेवर तयार झालेली ही या प्रकारची पहिलीच मालिका असावी. हा खूप रुक्ष विषय आहे, असं कुणाला वाटेल, परंतु आम्ही तो अत्यंत रंजक पद्धतीने मांडला आहे. या मालिकेतून आम्ही खूप काही शिकलोय. काम करताना आपण शिकणे ही खूप मोठी गोष्ट असते. कारण तुम्ही ज्ञानाने समृद्ध होत असता. या मालिकेमुळे मी खरोखरंच ज्ञानसमृद्ध झालोय. आज भारतीय प्रजासत्ताकाला ६४ वर्ष झालीत. एवढय़ा वर्षात आपण कधी घटनेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. आज आपण घटनेवर घाला आला वगैरे म्हणतो, पण प्रत्येक पिढीच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्यानुसार घटना बदलणे भाग असतं. घटना हा जिवंत दस्तावेज असायला हवा, मृत नव्हे. सांगायचा मुद्दा हा की, ६४ वर्षानीही आमची घटना तेव्हा जशी नवी होती, तशीच आहे. मग भले आमच्या देशात वेगवेगळ्या समस्या असतील, पण आपली घटना सर्वोत्कृष्ट आहे.’ या सर्वोत्कृष्ट घटनेची जडणघडण कशी झाली, हेच सर्वसामान्य प्रेक्षकांना जसंच्या तसं दाखवण्याचं काम ‘संविधान : द मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिटय़ूशन’ ही मालिका करणार आहे.
आनंददायी अनुभव!
मला ‘संविधान’साठी काम करण्यास सांगण्यात आलं तेव्हा मी खूपच रोमांचित झाले होते. मला जेव्हा या मालिकेचं कथानक देण्यात आलं तेव्हा यात इतके कलाकार काम करणार आहेत, हे पाहून मी चकितच झाले. सुरुवातीला त्यात २६४ कलाकार होते, नंतर त्यांची संख्या कमी करून १५५ करण्यात आली. या प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी खूप संशोधन करण्यात आलं. खूप मेहनतीअंती आम्ही त्या काळच्या नेत्यांची हुबेहुब व्यक्तिरेखा साकारल्या. या प्रोजेक्टमध्ये मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामील होते. या काळात वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना रंगरूप देणं हा एक आनंददायी अनुभव होता.- पिया बेनेगल (कॉस्च्युम डिझायनर)
कलाकार म्हणून आनंद देणारी अनुभूती!
मी यापूर्वी श्याम बेनेगल यांच्याबरोबर ‘नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉर्गटन हिरो’ या चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका केली होती. आता त्यांच्याबरोबर डॉ. आंबेडकर यांची आणखी एक उत्तुंग ऐतिहासिक व्यक्तिरेखा करायला मिळतेय, याचं खूप समाधान आहे. कलाकार म्हणून त्याचा आनंद वेगळा आहे. शिवाय यात थिएटरवाले दीडशेक कलाकार असल्याने त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक आगळा अनुभव होता. आपल्या घटनेबद्दल आपल्या पिढीला किती कमी माहिती आहे, हे मला ही या मालिकेत भूमिका करताना प्रकर्षाने जाणवलं. अर्थात, त्या वेळी घडलेल्यांपैकी काही गोष्टीच या मालिकेत घेतल्या आहेत. मेकअपमन विक्रम गायकवाड यांनी मला हुबेहुब डॉ. आंबेडकरांचं रूप दिलं. पिया बेनेगल यांनी त्याचे कॉस्च्युम अप्रतिम साकारले. या मालिकेत आंबेडकरांचे जे संवाद आहेत ते रेकॉर्डेड आहेत. म्हणजे त्या वेळी झालेल्या बैठकांमधील इतिवृत्तांचं ऑडिओ रकॉर्डिंग आहे. आंबेडकरांनी शेवटचं जे भाषण केलं त्याचाही ऑडिओ रेफरन्स माझ्याकडे होत्या. त्यामुळे त्यांची बोलण्याची ढब मला कळाली.
या
मालिकेचं हे स्क्रिप्ट सहा एक महिने माझ्याकडे होतं. त्यामुळे मला आंबेडकर साकारण्याची तयारी करता आली. ही भूमिका साकारताना मला आंबेडकरांची विद्वत्ता, प्रतिभा ख-या अर्थाने कळली. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा भव्यपणा कळला. खरं तर शिक्षक म्हणता येईल, असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. या सगळ्या गोष्टी मालिकेत आलेल्या नाहीत, परंतु हे आंबेडकर मला ही भूमिका करता करता गवसले.
मला असं वाटतं की, आपल्याकडील प्रत्येक मतदाराने आपली मूलभूत घटना जाणून घ्यायला हवी. आजही आपण राखीव जागा वगैरे विषयांवर बोलतो, तेव्हा साठ वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी घटनाकारांनी कशा मुद्देसूद लिहिल्यात, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, त्या वेळी प्रत्येक नेता त्यांच्या त्यांच्या विचारांसाठी लढत असला तरी त्या सगळ्यांच्या मनात देशाचं हितच होतं. ही गोष्ट आजच्या नेत्यांमध्ये दिसत नाही. आजचे सगळे नेते आपल्या मतदारसंघापुरताच विचार करतात. त्यामुळे त्या वेळची माणसं किती मोठी होती, हे कळतं.
- सचिन खेडेकर